वाढवणं बंदर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सर्व मच्छिमार संघटना, आदिवासी संघटना,सेवाभावी संघटना,स्थानिक ग्रामस्थांनी आज गांधी जयंतीला आयोजित वाढवणं बंदरविरोधी हाकेला मुंबई व ठाणे जिल्ह्यात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती,नॅशनल फिशवर्कर्स फोरम ( एनएनएफ), महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती, ( एमएमकेएस ),ठाणे जिल्हा मच्छिमार मध्य.सहकारी संघ लि,ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघ,पालघर या विविध संघटनांच्या नेतृत्वाखालील आज सकाळी १० ते १ वाजेपर्यंत मुंबई कफ-परेड ते झाई पालघर पर्यंत प्रत्येक कोळीवाड्यात वाढवण बंदर विरोधात आंदोलन व निर्दशने आयोजित केली होती.
किनारपट्टीवरील मुंबई, पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग आदी कोकणातील जिल्ह्यात या बंदचे जोरदार पडसाद उमटले.एकच जिद्द वाढवण बंदर रद्द,वाढवण बंदरातून जेएनपीटी चले जाव,मासेमारी बंद, मासळी मार्केट बंद अश्या घोषणा देत मच्छिमारांनी सारा परिसर दणाणून सोडला होता.
या आंदोलनाला ससून डाॅक, भाऊचा धक्का, छत्रपती शिवाजीमहाराज मंडई (क्राॅफर मार्केट) मालाड मार्केट येथील सी फूड असोसिएशन यांनी पाठिंबा जाहीर करून मार्केट बंद ठेवली होती.
मुंबई शहर व उपनगर येथील कोळीवाड्यात एमएमकेएसचे सरचिटणीस किरण कोळी, मुंबई अध्यक्ष परशुराम मेहेर, महिला संघटक उज्वला पाटील, मच्छि. संस्था अध्यक्ष जयेश भोईर, दिलिप कोळी, सदस्य भुवनेश्वर धनु,सी फूड असोसिएशन चे कृष्णा पोवळे, अब्दुल गफार, कृष्णा चव्हाण, बळवंत पवार यांनी जोरदार निदर्शने केली.
मासेमारीवर अवलंबून असलेल्या ७०००/७५०० मासेमारी नौका सदर समुद्र क्षेत्रात मासेमारी करतात. पाच लाखांहून अधिक मच्छिमार व त्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांचा उदरनिर्वाह हिरावून मच्छिमार, शेतकरी, आदिवासी, डायमेकर यांना देशोधडीला लावणारा प्रकल्प आहे अशी टिका किरण कोळी यांनी केली.
पालघर जिल्ह्यात एमएमकेएसचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, महिला संघटक पूर्णिमा मेहेर, पालघर/ठाणे ज्योती मेहेर, उपाध्यक्ष राजन मेहेर, अशोक अंभीरे,सुभाष तामोरे, ठाणे जि.मच्छि.म.स.संघ जयकुमार भाय, ठाणे जि.मच्छि.म.स.संघ जगदीश नाईक, सचिव मोरेश्र्वर वैती, जि. अध्यक्ष मानवेंद्र आरेकर, उपाध्यक्ष विजय थाटू, हेमंत तामोरे, धनंजय तरे,जयवन्त तांडेल, प्रशांत नाईक,वैभव भोईर, भिवनेश्वर पागधरे, दर्शना पागधरे, प्राची नाईक,रेखा तरे,हर्षदा तरे,महानंदा राऊत,जयमाला दांडेकर,संगीता नाईक ठाणे जिल्ह्यात अध्यक्ष लिओ कोलासो, जि. अध्यक्ष वेलेरीन पांडीक यांनी आंदोलनात सहभाग घेतला.