यंदाही खड्ड्यांची तक्रार ॲपद्वारे नोंदवता येणार; ‘पॉटहोल ट्रॅकिंग’साठी पालिकेची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 11:15 AM2024-05-31T11:15:33+5:302024-05-31T11:24:22+5:30
मुंबईतील रस्ते कायमचे खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेतले आहे.
मुंबई : मुंबईतील रस्ते कायमचे खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेतले आहे. त्यादृष्टीने अनेक ठिकाणी कामेही सुरू असली तरी सर्व रस्ते काँक्रिटचे होण्यासाठी दोन वर्षे लागणार आहेत. यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे शोधण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टमची मदत घेतली जाणार आहे. ही यंत्रणा १ जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत कार्यरत असणार आहे. नागरिकांना खड्ड्यांचे फोटो काढून ॲपवर त्याची तक्रार नोंदवता येणार आहे. पालिकेची विभागीय कार्यालये त्याची लागलीच दखल घेऊन ते बुजवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पालिकेच्या रस्ते विभागाकडून खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. सप्टेंबरपर्यंत हे काम सुरू असते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीही दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. त्यामुळे नागरिक, वाहनचालकांची गैरसोय होते. पालिकेलाही नागरिकांच्या टीकेला सामोरे जावे लागते. त्यामुळे खड्डे तत्काळ बुजवता यावेत तसेच नागरिकांना खड्ड्यांची तक्रार नोंदवणे शक्य व्हावे, यासाठी पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टम २०११ पासून सर्व विभागीय अभियंते आणि केंद्रीय रस्ते विभागाकडून वापरण्यात येत आहे. या अनोख्या यंत्रणेला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला होता.
या संकेतस्थळावर वरिष्ठांचे लक्ष असल्यामुळे ४८ तासांत खड्डे बुजविण्याची खबरदारी अभियंता घेत होते. मात्र काही कारणास्तव १ एप्रिल २०१६ पासून या संकेतस्थळाचे कंत्राट संपले आणि मध्यंतरीच्या काळात ही यंत्रणा बंद होती. मात्र ही यंत्रणा प्रभावी असल्याने पालिकेने ॲपच्या मदतीने ही खड्डे शोध मोहीम राबवण्यावर
भर दिला आहे.
मागील वर्षांतील खड्डे-
१) २०२० ६५ हजार ६१७
२) २०२१ ४३ हजार ४७८
३) २०२२ ३८ हजार ३१०
४) २०२३ ७१ हजार ७७३ (सप्टेंबरपर्यंत)
अशी नोंदवा तक्रार-
नागरिकांना खड्ड्यांचे फोटो काढून त्याची तक्रार मोबाइल ॲपवर ठिकाणासह नोंदवता येते. या तक्रारीचे नोटिफिकेशन संबंधित वॉर्डातील रस्ते अभियंत्यांना मिळते. या ॲपमध्ये सर्व विभागीय अभियंत्यांची माहिती त्यांच्या विभागीय हद्दीनुसार फीड केलेली आहे. त्यामुळे नोंदवलेली तक्रार संबंधित अभियंत्यालाच प्राप्त होते. तर, तक्रारदाराला आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली याची माहितीही मिळते. अभियंते खड्डे बुजविल्यावर त्याचा फोटो काढून तक्रार निकाली काढल्याची माहिती ही या ॲपवर देतात.