म्हाडाच्या ४६४० सदनिका संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ        

By सचिन लुंगसे | Published: March 8, 2023 07:39 PM2023-03-08T19:39:05+5:302023-03-08T19:39:32+5:30

म्हाडाच्या ४६४० सदनिका संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.       

 The application registration and application filling process for computerized allotment of 4640 flats of MHADA has started  | म्हाडाच्या ४६४० सदनिका संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ        

म्हाडाच्या ४६४० सदनिका संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ        

googlenewsNext

मुंबई: म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) सचिव राजकुमार सागर यांच्या हस्ते व कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.

मंडळातर्फे सदनिका व भूखंड विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत १० मे, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे.  म्हाडातर्फे तयार करण्यात आलेल्या IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management system) या नूतन संगणकीय प्रणालीनुसार नोंदणीकरणादरम्यान सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार हे पात्र अर्जदार ठरणार आहेत.  

IHLMS 2.0 या नूतन संगणकीय प्रणाली व ऍपच्या साहाय्याने सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस आज दुपारी १२.०० वाजेपासून सुरवात झाली. नवीन आज्ञावली नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरणार आहे कारण अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सहजरित्या उपलब्ध होणार आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios)या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमच्या साहाय्याने आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकतात.

तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता  https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहितीपुस्तिका, ध्वनीचित्रफिती, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहितीचे अवलोकन करावे, असे आवाहन कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी केले आहे.  

IHLMS 2.0 या संगणकीय प्रणाली अंतर्गत अर्ज नोंदणी जरी अमर्याद काळ सुरु राहणार असली तरी कोंकण मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत अर्जदार १० एप्रिल, २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सहभाग घेऊ शकतात. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या प्रणालीवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे.  दिनांक १२ एप्रिल, २०२३ रात्री ११.५९ पर्यंत अर्जदार अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील. 

१२ एप्रिल, २०२३ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. अशाप्रकारे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदाराच या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी ०४ मे, २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक १० मे, २०२३ रोजी सकाळी १० वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार असून अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच ऍपवर प्राप्त होणार आहे.  

सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ९८४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण १४५६ सदनिका उपलब्ध असणार आहेत. म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत १४ भूखंड व १५२ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २०४८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडतीसंदर्भात अर्ज भरतांना अर्जदारांना येणार्‍या अडचणीचे निराकरण करण्यासाठी ०२२ - ६९४६८१०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  

मोरे यांनी सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आवाहन केले आहे की, नूतन संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून कोणत्याही प्रकारे मानवीय हस्तक्षेपास वाव नाही. शिवाय या सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ /दलाल/ मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस कोंकण मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही.

 

Web Title:  The application registration and application filling process for computerized allotment of 4640 flats of MHADA has started 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.