मेट्रो स्थानकांचा परिसर होणार वाहतूककोंडीमुक्त, मल्टिमॉडल इंटिग्रेशन पद्धतीने होणार विकास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 09:53 AM2024-03-09T09:53:34+5:302024-03-09T09:55:32+5:30
९, ७ ‘अ’ वर मल्टिमॉडल इंटिग्रेशन पद्धतीने विकास.
मुंबई : मेट्रो स्थानकांच्या परिसरातील वाहतूककोंडी टळावी, तसेच नागरिकांना मेट्रो स्थानकावर सहजरीत्या पोहोचता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रो मार्गिकांच्या स्थानकांवर मल्टिमॉडल इंटिग्रेशन पद्धतीने सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यानुसार आता दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ आणि अंधेरी पूर्व ते आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो ७ ‘अ’ मार्गिकेवरील १० स्थानकांच्या परिसराचा विकास केला जाणार आहे.
त्यात सायकल मार्ग, बस, खासगी वाहने आणि सेवा पुरवठादार संस्थांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका आणि पादचारी मार्गाचा विस्तार यांसारख्या सुविधांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे. मेट्रो स्थानकांवर येणारे प्रवासी हे घर अथवा कार्यालयातून बस, रिक्षा, दुचाकी, खासगी वाहने अथवा पायी येतात. एकाच वेळी मोठ्या संख्येने आलेल्या प्रवाशांमुळे स्थानकांच्या परिसरात कोंडीसदृश परिस्थिती निर्माण होते. तसेच या भागांत रस्त्यावर आणि पदपथावर अतिक्रमणे झालेली आढळून येतात. परिसरात अस्वच्छता दिसते. या सर्वांवर तोडगा काढून मेट्रो स्थानकांचा परिसर प्रवासीभिमुख केला जाणार आहे.
१६३ कोटींचा खर्च अपेक्षित : एमएमआरडीएकडून या दोन्ही मेट्रो मार्गिकांवरील मिळून १० स्थानकांचा विकास करण्यात येईल. यासाठी १६३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे एका स्थानकासाठी जवळपास १६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातील मेट्रो ९ मार्गिकेवरील ८ स्थानकांच्या परिसराचा मल्टिमॉडल इंटिग्रेशन पद्धतीने विकास साधण्यासाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीची प्रक्रिया एमएमआरडीएने सुरू केली आहे.
या असतील सुविधा, गर्दी टाळण्यावरही भर -
१) मेट्रो मार्गिकेच्या २५० मीटर परिसरातील भागाचा विकास
२) पदपथांचे रुंदीकरण
३) सायकल ट्रॅकची निर्मिती
४) मेट्रो स्थानकानजीकच बस, रिक्षा आणि खासगी वाहनांसाठी स्वतंत्र थांबे. यातून एकाच ठिकाणी होणारी गर्दी टळणार
५) स्थानकांच्या परिसरात लेन मार्किंग, चिन्हे, बलार्ड, बाके, ई-टॉयलेट आदींचा विकास
६) माहिती फलक
७) सोलर आधारित पथ दिवे, सीसीटीव्ही यंत्रणा
८) परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.