मुंबई/बीड - मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन हिंसक वळणावर जाऊन पोहोचले असून बीडमध्ये याचे सर्वात जास्त पडसाद उमटले आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून आंदोलनांनी उग्ररुप धारण केले आहे. सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाल्याने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी सोमवारी रात्री आठ वाजता तत्काळ संचारबंदी आदेश लागू केली होती. मात्र, तत्पूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावरही काहींनी हल्ला केला. आता, स्वत: आमदार क्षीरसागर यांनी घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली आहे. तसेच, माझ्या घरावर हल्ला कोणी केला, याबाबत योग्यवेळी सांगेन, असेही त्यांनी म्हटलं.
बीडमध्ये सोमवारी सायंकाळी सहा वाजता राष्ट्रवादी भवनचे कार्यालय पेटविण्यात आले. तेथून हे सर्व लोक आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी गेले. त्यांचे घर व कार्यालय, घरासमोरील वाहने पेटविण्यात आले. मंगळवारी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. बीडमधील जालना रोडवरील हॉटेल सनराइजही पेटवून देण्यात आले. यासंदर्भात माहिती देताना आमदार क्षीरसागर यांनी सोशल मीडियातून घटनेचा वृत्तांत दिला. तसेच, माझ्या घरावर हल्ला करणारे मराठा बांधव नसून समाजकंटक आहेत, असेही त्यांनी म्हटले.
३० ऑक्टोबर २०२३ रोजी बीड शहरात अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या. माझ्या राहत्या घरावर देखील हल्ला झाला. माझे मुल, पत्नी व सर्व कुटुंब यावेळी घरातच होते पण मतदारसंघातील व जिल्ह्यातील नागरिकांच्या व परमेश्वराच्या आशिर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप आहोत. मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली. अतिशय शांततेत व शिस्तीत सर्व आंदोलन करणारा माझा मराठा बांधव हिंसक आंदोलन करू शकणार नाही. काल जो प्रकार घडला तो मराठा समाजाने किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसुन काही समाजकंटकांनी केला असावा. याबाबत आताच काही बोलणार नाही, तसेच योग्यवेळी पुराव्यानिशी बोलेल, असे म्हणत आमदार संदीप क्षीरसागर यांनी घडला प्रकार सोशल मीडियातून सांगितला.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. त्यांच्या तब्येतीची माझ्यासह आपल्या सर्वांना काळजी आहे. सरकारने या बाबतीत तातडीने योग्य व सकारात्मक निर्णय घ्यायला हवा. सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीला सुरुवातीपासून मी पाठिंबा दिलेला असून शासन दरबारी पत्राद्वारेही मी मागणी केली होती. ही मागणी होऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावण्यासाठी मी देखील प्रयत्न करत राहणार, असेही आमदार क्षीरसागर यांनी म्हटले.
बीडमध्ये १ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंद
बीडमध्ये १ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये एसआरपीएफच्या ५ तुकड्या दाखल झाल्या आहेत. रात्री बीड एसटी डेपोतील ७२ बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मराठवाडा रेंजचे पोलीस महानिरीक्षक चव्हाण बीडमध्ये दाखल झाले आहेत. संचारबंदी आदेशानुसार बीड जिल्हा मुख्यालय व सर्व तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटरच्या हद्दीपर्यंत सर्व राष्ट्रीय महामार्गावर पुढील आदेशापर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.