माझ्या जीवनातील पुरस्कारदुर्भिक्ष संपले! पी. सावळाराम पुरस्कार उदय सबनीस यांना प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 09:39 IST2025-02-24T09:39:46+5:302025-02-24T09:39:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ‘जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार’ मला मिळाला आणि माझ्या आयुष्यातील पुरस्काराचे दुर्भिक्ष संपले. पी. ...

माझ्या जीवनातील पुरस्कारदुर्भिक्ष संपले! पी. सावळाराम पुरस्कार उदय सबनीस यांना प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ‘जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार’ मला मिळाला आणि माझ्या आयुष्यातील पुरस्काराचे दुर्भिक्ष संपले. पी. सावळाराम हे संगीतासह राजकारणातील प्रभावशाली व्यक्ती होते. अशा व्यक्तीला मी पाहिले... आता त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे असे मला वाटते, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांनी रविवारी व्यक्त केल्या.
ठाणे पालिका आणि जनकवी पी. सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी झालेल्या सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते जनकवी पी. सावळाराम पुरस्कार सबनीस यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप ७५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे होते. सबनीस म्हणाले, माझ्या गुरुजनांनी मला शिकवले; पण मला जाणणारा माइक नावाचा मित्र भेटला. शक्यतो त्याच्या जवळच मी राहतो.
‘आमचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षकांना पैसे द्यावे लागतात’
खासदार म्हस्के म्हणाले की, शिवसेनेचा चाणक्य मला म्हटले जाते. अभिनय क्षेत्राबरोबर राजकीय क्षेत्रात देखील कलाकार आहे. मात्र, त्या कलाकारांपेक्षा आमचा अभिनय वेगळा आहे. ते कलाकार अभिनय क्षेत्रातील आहेत. आम्ही मात्र राजकारणातील अभिनेते म्हणून काम करतो. त्यांचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक पैसे देऊन येतात, मात्र आमचा अभिनय पाहण्यासाठी आम्हाला प्रेक्षकांना पैसे देऊन आणावे लागते.
लीना भागवत यांना गंगा-जमुना पुरस्कार
गंगा-जमुना पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना देण्यात आला. त्याचे स्वरूप ५१ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे होते. साहित्य क्षेत्रातील पुरस्कार निकिता भागवत, शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार अरुंधती भालेराव, उदयोन्मुख कलावंत पुरस्कार दत्तू मोरे यांना देण्यात आला. प्रत्येकी २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे त्यांचे स्वरूप होते.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदापुरे, उदय पाटील आणि ओमकार पाटील उपस्थित होते. साधना जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पी. सावळाराम यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम संपन्न झाला.