Join us

पुरस्कर्ते जाहीर, अन् तो शासन निर्णयच मागे; सांस्कृतिक क्षेत्रात संदिग्धता

By स्नेहा मोरे | Published: November 07, 2023 7:56 PM

विभागाच्या वतीने एक नोव्हेंबर रोजी पुरस्कार निवड समिती पुनर्गठीत करण्यात आली होती.

मुंबई - राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मंगळवारी मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या संगीताचार्य कै. बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कारांची घोषणा केली होती. या शासन निर्णयानुसार, २०२२ या वर्षासाठी ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे , २०२३ या सालासाठी पं.मकरंद कुंडले यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. परंतु, हे दोन्ही पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही वेळातच हा शासन निर्णय मागे घेण्यात आल्याने आता सांस्कृतिक क्षेत्रात संदिग्धता निर्माण झाली आहे.

संगीत रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास संगीताचार्य कै. बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारांचे पुरस्कार्थी निवडण्यासाठी निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे.

विभागाच्या वतीने एक नोव्हेंबर रोजी पुरस्कार निवड समिती पुनर्गठीत करण्यात आली होती. या शासन निर्णयानुसार, नव्या समितीवर पदसिद्ध सदस्यांची नियुक्ती असेल असे शासन निर्णयात म्हटले होते. त्याप्रमाणे, या समितीत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय नाट्य संमेलन अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी, या समितीवरील शुभदा दादरकर यांची अशासकीय पदी असणारी नियुक्ती रद्द करुन मुकुंद मराठे यांची नियुक्ती करण्यात आली होती.