मुंबई : पुण्यातील अवघ्या १२ दिवसांच्या बाळाला स्पायना बिफिडा या जन्मजात दोषाचे निदान झाल्यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला. या बाळाच्या पाठीच्या मणक्यावर ट्युमर असल्याचे दिसून आले, त्यामुळे एरव्ही सहा महिन्यानंतरील बाळ असल्यास शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जातो. मात्र या प्रकरणात बाळाच्या आजाराची तीव्रता पाहून अवघ्या १२ दिवसांच्या या बाळावर तब्बल सहा तास शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान डॉक्टरांनी पेलले.
पाठीवरील पोकळीतून स्त्राव बाहेर निघत असल्याच्या अवस्थेत त्याच्या पालकांनी बाळाला रुग्णालयात आणले. पाठीच्या मणक्यावर ट्युमरचा आकार जसजसा वाढत जातो तसतसा पाठीचा मणका घट्ट होतो व परिणामी अवयवांमध्ये लकवा येतो. या बाळाची प्रकृती पाहून मुलूंड येथील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय़ घेतला. पाठीच्या कण्यावरील ट्युमरचा बाळाच्या नसांवर परिणाम झाला असता. त्याचे पाय अधू होऊन लकवा येण्याची शक्यताही होती. न्यूरो आणि स्पाइन सर्जरी विभागाचे वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. जयेश सरधारा आणि त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली.
बाळाच्या पाठीच्या कण्यावरील पोकळीतून स्त्राव बाहेर येत असल्याने कण्याला आणि नंतर मेंदूला जंतूसंसर्ग होण्याची शक्यता खूप गंभीर होती आणि दोष दूर करून ट्यूमर बाहेर काढणे अनिवार्य होते. अखेर ५ ते ६ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ट्यूमरही काढून टाकला. त्वचा पूर्ववत झाली असून पायांची हालचाल व्यवस्थित होत असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. जेसल शेठ यांनी सांगितले.
आजाराविषयी महत्त्वाचे
स्पायना बिफिडा हा नवजात शिशूमधील अपंगत्वाचे कारणीभूत ठरणारा आजार आहे. जगभरातील प्रत्येक २,५०० नवजात बालकांपैकी एका बालकास हा आजार असतो. या आजारात वेळच्यावेळी शस्त्रक्रिया केली नाही किंवा केली तरीही लकवा येण्याची शक्यता असते. जेव्हा गर्भाशयात बाळाचा मणका विकसित होतो तेव्हा न्यूरल ट्यूब, म्हणजे पुढे मेंदू आणि पाठीच्या मणक्यामध्ये विकसित होणारा पेशींचा थर पूर्णपणे बंद होत नाही.