लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अकाली जन्माला आलेल्या बाळाच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. अशाच जन्माला आलेल्या एका नवजात बाळाला जीवदान देण्यात मुंबईतील चेंबूर येथील एसआरव्ही रूग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले आहे. २९ व्या आठवड्यात म्हणजे अवघ्या सात महिन्यांतच प्रीती टोपले यांनी बाळाला जन्म दिला. जन्मावेळी या बाळाचे वजन अवघे १.३ किलो इतकंच होते. एक महिन्यानंतर बाळाचे वजन १.७ किलो झाले आहे. महिनाभरानंतर बाळ आणि आईची प्रकृती उत्तम असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बदलत्या जीवनशैलीसह अन्य अनेक कारणांमुळे मुदतपूर्व बाळ जन्मदराच्या प्रमाणात वाढ होत आहे. मुंबईत राहणाऱ्या प्रीती टोपले यांच्या गर्भातील पाणी (एमनियोटिक द्रव) कमी झाल्याने त्यांची तातडीने प्रसूती करण्यात आली. स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. अमेया कनकिया म्हणाल्या , या महिलेला रुग्णालयात आणले तेव्हा ती २९ आठवड्याची गर्भवती होती. गर्भाशयातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गर्भातील पाणी कमी झाल्यास बाळाच्या जीवाला धोका असल्याने तातडीने सिझेरियन प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर बाळाचे वजन अवघे १.३ किलो इतके होते. अशा स्थितीत बाळाला लगेचच एनआयसीयूत हलविण्यात आले. विशेषतः ३८ ते ४० आठवड्यात गर्भातील बाळाची पूर्णतः वाढ झालेली असते. परंतु, २९ आठवड्यात प्रसूती केल्यावर बाळाला वाचवणं खूपच अवघड असते ; पण रूग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे या बाळाला नव्याने आयुष्य मिळाले आहे.
महिनाभर ऑक्सिजनवररूग्णालयातील नेओनॉटोलॉजिस्ट अँड पेडियाट्रिशियन डॉ. रोहित कांबळे म्हणाले , गर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने या महिलेची तातडीने सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली.अकाली जन्माला आलेल्या बाळाची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. या बाळाला लगेचच एनआयसीयूमध्ये हलविण्यात आले. अशा मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाची फुप्फुसाची वाढ पूर्णतः झालेली नसते. अशावेळी बाळाला श्वास घेण्यात अडचणी जाणवतात. त्याचप्रमाणे या नवजात बाळालाही एक महिना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. जन्मानंतर १५ दिवसांनी दूध घेता येत नसल्याने बाळाची प्रकृती खूपच बिघडली होती. शरीरातील प्लेटलेट्सची मात्रा कमी झाली होती. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी बाळावर उपचार करून त्याला नवीन आयुष्य दिले आहे. हळूहळू बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्याला घरी सोडण्यात आले आहे.