Join us

बँक कर्मचारीच निघाला चक्क चोर, लॉकरवरच डल्ला; ग्राहकाच्या लॉकरमधून ४७ लाखांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 10:06 AM

बनावट चावीच्या आधारे बँक कर्मचाऱ्यानेच बँकेच्या लॉकरमधून ४७ लाखांचा किमती ऐवज चोरल्याची धक्कादायक माहिती मलबारहिल पोलिसांच्या कारवाईतून समोर आली आहे.

मुंबई :

बनावट चावीच्या आधारे बँक कर्मचाऱ्यानेच बँकेच्या लॉकरमधून ४७ लाखांचा किमती ऐवज चोरल्याची धक्कादायक माहिती मलबारहिल पोलिसांच्या कारवाईतून समोर आली आहे. या प्रकरणी मलबारहिल पोलिसांनी बँक कर्मचाऱ्याला अटक केली आहे. दिलीप चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून लॉकर विभागाची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती.  

नेपियन्सी रोड येथील रहिवासी असलेल्या व्यावसायिक मृणालिनी जयसिंघानी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.   जयसिंघानी व त्यांच्या पतीचे वाळकेश्वर येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत दोन लॉकर आहेत. ६३६ व ७७६ क्रमांकाच्या या लॉकरमधून ३१ लाख ५२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने, परदेशी चलन चोरीला गेले होते. यापूर्वी १० मार्च २०२३ ला त्यांनी शेवटी बँकेला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी लॉकरची पाहणी केली. त्यानंतर १७ जुलैला पाहणी केली तेव्हा लॉकरमधील ऐवज गायब असल्याचे समजले. त्यांनी याबाबत बँकेत तक्रार दिली. तसेच, मलबार हिल  पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. 

त्याच दरम्यान आणखी एका वृद्ध बँक खातेधारकाच्या लॉकरमधून १६ लाख रुपयांचे हिऱ्यांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार केली. तेथे सीसीटीव्ही उपलब्ध नव्हते.  १० मार्च ते १७ जुलै दरम्यान चोरी झाली असून त्यासाठी बनावट चावीचा आधार घेतल्याचा संशय पोलिसांना होता. हाच धागा पकडून केलेल्या  तपासात लॉकरची जबाबदारी असलेला बँक कर्मचारीच चोर असल्याचे समोर आले. 

२०१३ पासून कामाला आरोपी २०१३ पासून बँकेत नोकरीला आहे. गेल्या वर्षीच त्याची बँकेच्या वाळकेश्वर येथील शाखेमध्ये बदली झाली होती. आरोपीकडून गुन्ह्यातील ४८१ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याने आणखी कुठे काही चोरी केली आहे का? याबाबतही पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई