स्विमिंग पूलवरून बँकरचे दागिने पळवले! लॉकरला लॉक न केल्याचा घेतला फायदा
By गौरी टेंबकर | Updated: April 6, 2024 18:30 IST2024-04-06T18:29:43+5:302024-04-06T18:30:11+5:30
तक्रारदार अवनी चव्हाण (३८) या कांदिवली पश्चिमच्या चारकोपमध्ये राहतात. त्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तर त्यांचे पती एचडीएफसी बँकेत कामाला आहेत.

स्विमिंग पूलवरून बँकरचे दागिने पळवले! लॉकरला लॉक न केल्याचा घेतला फायदा
मुंबई: कांदिवलीच्या जलतरण तलावात पोहायला गेलेल्या एका महिला बँकरचे दागिने चोरी करण्यात आले. या विरोधात त्यांनी अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार अवनी चव्हाण (३८) या कांदिवली पश्चिमच्या चारकोपमध्ये राहतात. त्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तर त्यांचे पती एचडीएफसी बँकेत कामाला आहेत. अवनीच्या तक्रारीनुसार त्या स्विमिंग करायला रोज कांदिवली पश्चिमच्या सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलाव याठिकाणी संध्याकाळी ६ ते ७ जात असतात. नेहमीप्रमाणे २ एप्रिलला देखील त्या पोहायला जाण्यासाठी चेंजिंग रूममध्ये गेल्या. त्यांनी पैसे आणि दागिने असलेली त्यांची पर्स चेंजिंग रूमच्या लॉकरमध्ये ठेवली आणि त्यानंतर घाईघाईतच कपडे बदलायला गेल्या. कपडे बदलून १० मिनिटात त्या बाहेर आल्या तेव्हा त्यांनी लॉकरमध्ये ठेवलेली त्यांची पर्स त्यांना आढळली नाही. त्यामुळे त्यांनी सर्वत्र शोधले पण त्यांना ती कुठेच सापडली नाही. अखेर त्यांनी जलतरण तलावाच्या जवळील क्लार्क रूममध्ये जाऊन घडला प्रकार सांगितला. तिथल्या स्टाफने देखील पर्सचा शोध घेतला मात्र त्यांनाही ती सापडले नाही.
तक्रारदार या कपडे बदलायला गेल्यावर त्यांनी घाईगडबडीत लॉकरला लॉक लावले नव्हते त्याचाच कोणीतरी फायदा घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे. पर्समध्ये असलेला जवळपास ४८ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल पळवून नेण्यात आल्याचे अवनी यांचे म्हणणे असून या विरोधात त्यांनी कांदिवली पोलिसात धाव घेतली आहे.