पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते ३८ हजार ८०० कोटींच्या विकासकामांचं लोकापर्ण आणि काही कामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्तानं, काही वर्षांपासून रखडलेल्या आणि मुंबईसाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रकल्पांना गती देण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न आहे. मात्र नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून टीका करण्यात येत, शिवसेना नेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा राजकीय दौरा असून निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच हा दौरा होत असल्याचं म्हटलं आहे. यावर, आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिलं. तसेच, पार्थ पवार यांच्या नाराजीचं कारणही सांगितलं.
गोपीचंद पडळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा हा विकासकामांच्या उद्घाटनाचा असून यास वेगळं वळण देऊ नये, असे म्हटलं आहे. गेल्या 8 वर्षात विकास करण्यात मोदी सरकार अग्रेसर आहे. त्यामुळे, नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याला दुसरा कोणता रंग देऊ नये. विकासकामाचा शुभारंभ आज होतोय, सकारात्मक बदल होतोय, असे पडळकर यांनी म्हटले. तसेच, भाजप कायम निवडणुकीच्या तयारीच असते. मोदींनी विरोधकांना दुबळे न समजता कामाला लागा असा संदेश आम्हाला दिलाय, असेही त्यांनी सांगतिले. यावेळी, पडळकरांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल केला. तसेच, बारामतीची जागा थोडक्या मतांनी गेल्याचंही पडळकर यांनी म्हटलं.
लोकसभा निवडणुकांवेळी बारामतीची जागा थोडक्या मतांनी गेली होती, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा 48 जागा जिंकतील, असा दावाच पडळकर यांनी केला आहे. तसेच पार्थ पवार हे नाराज असतील म्हणूनच त्यांनी शंभूराज देसाई यांची भेट घेतली असावी. कारण, रोहित पवार हे विधानसभेचे सदस्य आहेत, मुंबई क्रिकेट मंडळाचे अध्यक्षही तेच झाले. त्यामुळे पार्थ नाराज असू शकतात. घरातून, आजोबांकडून अन्याय होत असेल म्हणून शंभुराज देसाईंची भेट घेतली असेल, पार्थ यांनाही राजकारणात स्थिर व्हायचं असेल, असेही पडळकर यांनी म्हटलं.
दरम्यान, मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीनं आणि भाजप-शिंदे गटाकडून मोदींच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोदींच्या हस्ते बीकेसी मैदानात मुंबईतील विविध विकासकामांचं भूमिपूजनही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी बीकेसी मैदानात तीन व्यासपीठं उभारण्यात आली आहेत. त्यात मुख्य स्टेजवर पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेते असतील. दुसऱ्या स्टेजवर अवधूत गुप्ते यांच्या संगीताचा कार्यक्रम होईल. तर तिसऱ्या स्टेजवर भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे.