Join us  

...तरी, लढाई तेवढी सोपी नाही; अमित शाह यांच्या ‘त्या’ भाषणाचा मेसेज काय?

By अतुल कुलकर्णी | Published: September 12, 2022 9:08 AM

२०१७ साली शिवसेनेला २२७ पैकी ८४ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेचे उमेदवार ८९ प्रभागांत दुसऱ्या क्रमांकावर होते.

भाजपने शब्द फिरवला. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिले नाही, म्हणून आपण काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार बनवले, असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनीच आपल्याला धोका दिला. त्यांना आता जमीन दाखवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत अमित शहा यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. धोका सहन करण्याची सवय लागली की तुम्ही कधीही राजकारणात यशस्वी होत नाही. आपण धोका सहन करू शकत नाही, असे सांगताना ज्या कारणामुळे युती तुटली ती कारणेसुद्धा शहा यांनी उपस्थितांना पहिल्यांदा सांगितली. त्यांच्या या दौऱ्यानंतर भाजपचा अजेंडा स्पष्ट झाला आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई महापालिकेमधून पायउतार करायचे. त्याचवेळी त्यांना कसलीही सहानुभूती मिळू द्यायची नाही, हे शहा यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या अहंकारामुळे भाजप शिवसेना युती तुटली. केवळ दोन जागांसाठी ते अडून राहिल्याचे त्यांनी सांगितले. आपण नशा करत नाही, त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा शब्द देण्याचा विषयच येत नाही, म्हणत त्यांनी ठाकरेंवर गंभीर आक्षेपही घेतले.

धोका देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे सांगताना महापालिका निवडणुकीचे नॅरेटिव्ह तुम्हाला सेट करायचे आहे हेही त्यांनी राज्यातल्या भाजप नेत्यांना सांगून टाकले आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची, हे भाजपचे मिशन आहे. त्यासाठी जे लोक कामाचे आहेत त्यांना सोबत घ्यायचे. याविषयी त्यांच्या मनात कसलेही दुमत नाही. आ. आशिष शेलार जर मुंबई महापालिकेसाठी उपयोगी ठरत असतील तर त्यांच्यावर ती जबाबदारी दिलीच पाहिजे. त्यांना मंत्री केले नाही तरी चालेल. ही स्पष्टता भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांमध्ये आहे. जो, ज्या ठिकाणी कामाचा आहे, त्याला ते काम देणे आणि त्याच्याकडून ते काम करून घेणे ही नीती भाजपने कायम ठेवली आहे. त्यामुळेच त्यांनी आशिष शेलार यांचा उल्लेख करताना, मंत्रिपद सोडून शेलार यांनी मुंबई भाजपचे अध्यक्षपद घेतल्याचा आवर्जून उल्लेख केला. अन्य नेत्यांची नावं घेताना त्यांनी अशी कोणतीही विशेषणे लावली नाहीत. दिवाणखान्यातून राजकारण करण्याची भाजपची सवय नाही. प्रत्यक्ष मैदानात उतरून दोन हात करण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे हे अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.

एवढी स्वच्छ भूमिका असताना, आता भाजपच्या स्थानिक नेत्यांना शिवसेनेविषयीची सहानुभूती कमी करणे आणि आपल्याला कोणाची मतं मिळणार आहेत याविषयीचे नियोजन करणे एवढेच हाती उरले आहे. उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळेल, असे भाजपच्या काही नेत्यांना वाटते. ग्राउंडवर काम करणाऱ्यांचे नेटवर्क किती उरले आहे व ते किती काळ सोबत राहील, याची तपासणी आता उद्धव ठाकरे यांना करावी लागणार आहे. नुसती सहानुभूती असून उपयोग नाही. ती मतांमध्ये परिवर्तित झाली पाहिजे. ती किती होणार? यावर ठाकरे सेनेचे यश-अपयश अवलंबून आहे. लोकांच्या मनात ठाकरे यांना यश मिळणार नाही असे लक्षात आले तर मत वाया घालवण्यापेक्षा ते राज ठाकरे यांना द्यावे असे वाटणारा एक मोठा मराठी वर्ग आहे. मराठी मतं सगळीच्या सगळी ठाकरे सेनेला मिळणार नाहीत. कारण जसे राज ठाकरे मराठी आहेत, तसेच देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, भाई जगताप आणि शरद पवारदेखील मराठी आहेत. त्यामुळे मराठी मतांचे विभाजन होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. मात्र, उत्तर भारतीय आणि बिहारी मतांची जोड जर भाजपच्या बाजूने गेली तर चित्र बदलायला वेळ लागणार नाही.

मुंबई महापालिकेवर निर्विवाद सत्ता मिळवावी असे भाजपला वाटत असले तरी, लढाई तेवढी सोपी नाही. मराठी मतांचे विभाजन, ठाकरे सेनेला सहानुभूती मिळू न देणे, मतांची काटछाट करण्यासाठी राज ठाकरेंचा उपयोग, या गोष्टी भाजपला अत्यंत चलाखीने कराव्या लागणार आहेत. राज ठाकरे यांनाही या निवडणुकीच्या निमित्ताने अमित ठाकरे यांच्यासाठी ग्राउंड तयार करण्याची संधी आहे. त्यामुळे ते भाजपच्या किती मदतीला येतील..? आले तर अमित ठाकरेंची कारकीर्द एस्टॅब्लिश करण्यासाठी या सगळ्या निवडणुकीचा ते किती उपयोग करून घेतील..? यावरही बरीच गणित अवलंबून असतील

२०१७ साली शिवसेनेला २२७ पैकी ८४ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेचे उमेदवार ८९ प्रभागांत दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यात शिवसेना विरुद्ध भाजप अशा थेट लढतीत ६२ ठिकाणी भाजप तर ४३ ठिकाणी शिवसेना जिंकली होती. बदलत्या राजकीय परिस्थितीत एकट्या पडलेल्या शिवसेनेला आहे त्या ८४ जागा टिकवणे व दुसऱ्या क्रमांकाच्या जागांवर यश मिळवावे लागेल. भाजपला जिंकलेल्या ८२ जागा टिकवणे आणि दुसऱ्या क्रमांकावरच्या ५८ जागांपैकी किमान ३० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवावे लागणार आहे. 

टॅग्स :अमित शाहउद्धव ठाकरेराज ठाकरेभाजपाशिवसेना