मुंबई पदवीधर निवडणुकीच्या रणधुमाळीला झाली सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 10:43 AM2023-11-28T10:43:26+5:302023-11-28T10:44:18+5:30
शिंदे गटातून डॉ. दीपक सावंत, ठाकरे गटातून आमदार ॲड. अनिल परब चर्चेत.
मुंबई : येत्या जून २०२४ मध्ये मुंबई पदवीधर निवडणूक होत असून, त्याची रणधुमाळी आतापासूनच सुरू झाली आहे. शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट ही निवडणूक महायुतीत लढणार का? की शिंदे गट विरुद्ध भाजप अशी निवडणूक होणार का, अशी चर्चा सध्या या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिंदे गटातून माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, ठाकरे गटातून आमदार ॲड. अनिल परब यांची नावे सध्या चर्चेत आहेत.
पहिल्या टप्यात मुंबई उपनगरात ४३ हजार आणि मुंबई शहरात १५,४०० पदवीधर मतदारांनी नोंदणी केली होती. तर नोंदणीचा दुसरा टप्पा २६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर असा आहे. ठाकरे गट व शिंदे गटाने दुसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त पदवीधर उमेदवारांची नोंदणी करण्यासाठी कंबर कसली आहे. तर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनीसुद्धा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनेसुद्धा मुंबईतील २२७ शिवसेना शाखांमधून जास्तीत जास्त पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मातोश्रीवर या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी विभागवार बैठकासुद्धा झाल्या होत्या. त्यामुळे आता कार्यकर्ते देखील कामाला लागले आहेत.
मुंबईत सुमारे ३५ लाख पदवीधर आहेत. मात्र, त्या प्रमाणात पदवीधर मतदार नोंदणी ही मुंबईतील पदवीधरांच्या संख्येत अल्प होते. हा गेल्या ४०-४२ वर्षांचा इतिहास आहे. निवडणूक नोंदणी यंत्रणादेखील सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे विशेष परिश्रम घेत नाही. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या स्तरावर नोंदणी करतात. लोकशाहीसाठी निवडणुका महत्त्वाच्या असल्या तरी त्यासाठी नोंदणी ते मतदान या प्रक्रियेत सुटसुटीतपणा हवा - डॉ. दीपक सावंत, माजी आरोग्यमंत्री
मुंबई पदवीधर निवडणूक उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांची आघाडी एकत्रित मिळून लढणार आहे. उबाठाचा जो कोणी उमेदवार या निवडणुकीत उभा राहील, त्याला पाठिंबा आहे. या निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी काँग्रेस प्रयत्नांची पराकाष्ठा करेल - ॲड. धनंजय जुन्नरकर, प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस