Join us

सोशल मीडियावरची सुंदरी ‘ती’ नसून ‘तो’ आहे! लक्षात ठेवा!! ऑनलाईन लुटण्यासाठी नवीन फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 1:10 PM

फेसबुकवर सुंदरीचा फोटो ठेवून रिक्वेस्ट पाठवायची. मधाळ संवादातून जाळ्यात ओढायचे.

मुंबई :

फेसबुकवर सुंदरीचा फोटो ठेवून रिक्वेस्ट पाठवायची. मधाळ संवादातून जाळ्यात ओढायचे. सावज जाळ्यात येताच विविध क्षुल्काच्या नावाखाली खाते रिकामे करणाऱ्या ठगांचा पोलिसांकडून वेळोवेळी पर्दाफाश करण्यात आला आहे. प्रत्यक्षात पडद्यामागची सुंदरी ती नसून तो असल्याचेही समोर आले. त्यामुळे अशा मधाळ जाळ्यात अडकू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

यापूर्वीच्या एका कारवाईत मिर्झापूर, उत्तर प्रदेश येथील गडवली गावातील अभिषेक बीए झाला असून वाराणसी येथील एका खासगी कंपनीत मार्केटिंगचे काम करत होता. मार्केटिंगचे काम करताना तो त्याच्या गावाशेजारील सायबर गुन्हेगारांचे हब असलेल्या कटका गावात पोहोचला. तेथेच स्वतःचे बस्तान मांडले. फेसबुकवर देखण्या तरुणीचा फोटो ठेवून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. अनेक जण तरुणीचा फोटो पाहूनच तिच्या प्रेमात पडून कुठलाही मागचा पुढचा विचार न करता थेट तिची रिक्वेस्ट स्वीकारतात. दोघांमध्ये रंगलेल्या मधाळ संवादांनंतर विविध ऑफर देत फसवणूक करत होते. 

  सर्व सोशल मीडिया अकाऊंट्सची सेटिंग्ज प्रायव्हेट ठेवा. समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.   त्यातही अनोळखी, सुंदर आणि तरुण मुलींचा फोटो असलेल्या अकाऊंटपासून विशेष सावध राहा.   त्यांच्याशी पर्सनल चॅट बॉक्समध्ये चॅटिंग करू नका. विविध फ्रेंडशिप क्लबसाठी पैशांचे व्यवहार टाळा.   बदनामीची भीती घालून कोणी ब्लॅकमेल करत असेल तर, तत्काळ पोलिसांकडे तक्रार करा.

९ महिन्यात गुन्ह्यांची उकल गेल्या ९ महिन्यात सेक्सटॉर्शन प्रकरणी ४६ गुन्हे पोलिस दफ्तरी नोंद झाले आहेत. याप्रकरणी ९ गुन्ह्यांची उकल करत १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या टोळ्या राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणाच्या सीमावर्ती भागात हनी ट्रॅप लावून पैसे उकळणाऱ्या अनेक टोळ्या तयार झालेल्या आहेत. या टोळ्यांमध्ये आठवी ते बारावी पास मुलांना घेतले जाते.  त्यांना हे गुन्हे करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार ही टोळी एखाद्या  तरुण मुलीच्या जाळ्यात अडकवून लुटतात

टॅग्स :सोशल मीडियामुंबई