आता तीन वर्षांनी वाजणार दामोदर हॉलची घंटा; २०२६ मध्ये होणार सुरू, जुन्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 07:21 AM2023-11-01T07:21:48+5:302023-11-01T07:22:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई : सर्वसामान्यांचे मध्य मुंबईतील मनोरंजनाचे हक्काचे केंद्र असलेले तसेच कामगारवर्गातील बऱ्याच कलाकारांना संधी देणारा परळमधील ...

The bell of Damodar Hall will ring after three years now; To start in 2026, preference for old employees | आता तीन वर्षांनी वाजणार दामोदर हॉलची घंटा; २०२६ मध्ये होणार सुरू, जुन्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य

आता तीन वर्षांनी वाजणार दामोदर हॉलची घंटा; २०२६ मध्ये होणार सुरू, जुन्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सर्वसामान्यांचे मध्य मुंबईतील मनोरंजनाचे हक्काचे केंद्र असलेले तसेच कामगारवर्गातील बऱ्याच कलाकारांना संधी देणारा परळमधील दामोदर हॉल आजपासून बंद झाला आहे. २०२६मध्ये दामोदर हॅाल नव्या रूपात रसिकांच्या सेवेत रूजू होईल. हॉलमधील कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ पार पडला असून, दोन महिन्यांचा पगाराच्या स्वरूपात त्यांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे.

सोशल सर्व्हिस लीग संस्थेच्या शाळेत सध्या जवळपास ४५०० हजार विद्यार्थी शिकत आहेत. संस्थेने शाळा, चाळ आणि दामोदर हाॅलच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सर्वप्रथम हॉल आणि चाळ तोडण्यात येणार आहे. सध्या संस्थेचे कार्यालय असलेल्या ठिकाणी दामोदर हॉलची नवीन इमारत उभारण्यात येईल. हा संपूर्ण प्रकल्प दोन-अडीच वर्षांमध्ये पूर्ण होईल आणि २०२६मध्ये दामोदर हॉलची नवीन इमारत रसिकांसाठी खुली होणार असल्याचे संकेत संस्थेचे अध्यक्ष आनंद माईणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले आहेत.

  • दामोदर हॉलचे व्यवस्थापक सुंदर परब म्हणाले की, कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ झाला, पण भविष्याबाबत काहीच सांगितले नाही. 
  • आम्हा तीन व्यवस्थापकांची केवळ एक घड्याळ, पुष्पगुच्छ आणि नुकसानभरपाई म्हणून दोन पगार देऊन बोळवण करण्यात आली. आजपासून आम्ही बेरोजगार झालो. आता करायचे काय? हा प्रश्न आहे.
  • नाट्यपरिषदेपासून विभागातील रसिक मायबाप यांचा पाठिंबा आहे, पण त्यामुळे आमची चूल पेटणार नाही. काम निघाले तर बोलवू असे आश्वासन संस्थेने दिले आहे, पण खात्रीशीर काही नाही. तुटपुंजी रक्कम देऊन घरी पाठविले. संस्थेच्या इतर सेवांमध्ये आम्हाला सामील केले जाण्याची अपेक्षा होती, पण तसे काही झाले नाही.


दामोदर हॉलच्या नवीन इमारतीवर अंदाजे २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. जुना हॉल ७५० आसन क्षमतेचा आहे. भविष्यात इतक्याच आसन क्षमतेच्या हॉलसोबत ४०० आणि ६०० आसन क्षमतेचे हॉलही बांधण्यात येतील. दामोदर हॉल आणि त्यावर चार मजले अशी नवीन इमारत असेल. अंदाजे २०० गाड्या पार्क करण्याची सुविधा असेल. पावसाळ्यापूर्वी आयओडी आली की कामाला गती मिळेल. नवीन इमारत उभी राहिल्यावर जुन्या कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
- आनंद माईणकर, अध्यक्ष, सोशल सर्व्हिस लीग

Web Title: The bell of Damodar Hall will ring after three years now; To start in 2026, preference for old employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.