- गौरी टेंबकरमुंबई - बेस्ट बस चालकाची गाडी पुढे नेण्याची घाई एका ४७ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली असती. या अपघातात तिचा पाय बस खाली चिरडला गेला आणि त्यात झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विरोधात वांद्रे पोलिसांनी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेबाबत प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तक्रारदार फातिमा डिसोजा या प्रॉपर्टी एजंट असून त्या वांद्रे परिसरात १२ वर्षाच्या मुलीसोबत राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार ५ जानेवारी रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्या वांद्रे बस डेपो याठिकाणी बस रूट क्रमांक ८६ ची वाट पाहत उभ्या होत्या तितक्यात त्याठिकाणी बेस्टची (एम् एच ०१ सीव्ही ८०६२) क्रमांकाची बस आली. तेव्हा डिसोजा आणि इतर प्रवासी बसमध्ये चढू लागले. पण नेमकी त्याच वेळी चालकाने सदर बस हयगईने सुरू केली आणि पुढे नेली. त्यामुळे डिसोजा खाली पडल्या आणि त्यांचा उजवा पाय थेट बसच्या चाकाखाली आला. इतकेच नव्हे तर त्यांच्या डोक्याच्या मागे आणि पाठीलाही दुखापत झाली. ते पाहून बेस्ट निरीक्षक निंबाळकर यांनी त्यांना भाभा रुग्णालयात हलवले. तसेच पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिका १०८ ने केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले. जिथे त्यांच्यावर अंतरुग्ण वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. याविरोधात त्यांनी सदर चालका विरोधात वांद्रे पोलिसात तक्रार दिल्यावर भारतीय दंड संहिता कलम २७९, ३३७ तसेच ३३८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.