लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वाहनांमुळे होणारे वाढते प्रदूषण पाहता बेस्ट उपक्रमाने पर्यावरणपूरक बसची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. विजेवर चालणाऱ्या या बस प्रवाशांच्या पसंतीस पडत असून किफायतशीर तिकीट दरामुळे बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही वाढ झाली आहे. बेस्टच्या ताफ्यात लवकरच २१०० एसी बस येणार असून, २०२३ अखेर पर्यंत एसी बसची संख्या सात हजार इतकी होणार आहे.
बेस्टच्या ताफ्यात सध्या ३ हजार २२८ बस आहेत. यातील अनेक बस कालबाह्य होणार आहेत. वर्षभरात ५०० बसचे आयुर्मान संपुष्टात येणार असून, या बस भंगारात काढल्या जाणार आहेत. त्यामुळे बसची संख्या अपुरी पडू नये यासाठी आपल्या ताफ्यात आणखी बस उतरवण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे.
आवाज होत नाही, चार्जिंगची सोयएसी बस या विजेवर धावणाऱ्या असल्याने त्या कोणताही आवाज करत नाहीत. याशिवाय गारेगार प्रवासाचा आनंद घेताना या बसमध्ये मोबाइल चार्ज करण्याचीही सुविधा देण्यात आली आहे.
n बेस्ट बसचे दर इतर परिवहनच्या तुलनेत फारच कमी आहेत. n पाच किमी अंतरासाठी बेस्टच्या एसी बसचे भाडे हे सहा रुपये आहे, तर जास्तीतजास्त भाडे हे २५ रुपये आहे. त्यामुळे या बसमधून प्रवास करणे परवडते. n कमी किंमतीमुळे बेस्टच्या एसी बसना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बेस्टच्या बाजूने निकाल दिल्यामुळे बेस्टच्या ताफ्यात २१०० बस येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बेस्टने आपल्या धोरणानुसार २०२६ पर्यंत एकूण एसी बसचा ताफा १० हजारांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.
टप्प्याटप्प्याने या बस उपक्रमाकडे येणार असून, त्या शहर आणि उपनगरांत धावणार आहेत.