मधुकर भावे -२ जुलै २०२२ हा दिवस बाबूजींच्या (जवाहरलाल दर्डा) जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात. बाबूजी हा मोठ्या मनाचा माणूस होता. आयुष्यामध्ये चारही बाजूंनी हल्ले होत असताना कोणत्याही व्यक्तिमत्त्वाने किती समचित्त रहावे, याचा ते आदर्श होते. त्यांच्यासोबत मी १९७४ पासून १९९७ साली शेवटच्या दिवसांपर्यंत होतो. आयुष्यात त्यांच्या विरोधातील व्यक्तीबद्दल एकही चुकीचा शब्द, अनादराचा शब्द त्यांनी कधीही उच्चारला नाही. बाबूजींना भेटायला पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलो, त्या दिवशी त्यांनी मला आपल्यासोबत जेवायला बसवले आणि आपल्या ताटातली अर्धी भाकरी स्वतःच्या हाताने माझ्या ताटात वाढली होती, हे मी आयुष्यभर विसरलो नाही. हे व्यक्तिमत्त्व वेगळे आहे, हे त्या एका कृतीतून मला जाणवले होते. नंतर मनाचे धागे असे काही जुळले की, मी ‘लोकमत’चा आणि बाबूजींचा कधी होऊन गेलो, ते मलाही कळले नाही. बाबूजींचे आगळेवेगळेपण त्यांच्या मोठ्या मनात आणि माणुसकीमध्ये होते. एका छोट्या साप्ताहिकाचा महाराष्ट्रातील प्रमुख दैनिकात वटवृक्ष करण्याची धमक त्यांनी दाखविली. काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला, काँग्रेसचा विचार सोबत बाळगला... पण वृत्तपत्र चालवताना ‘पक्ष आणि वृत्तपत्र’ याची भेसळ त्यांनी कधी होऊ दिली नाही. सामान्य माणसांचे प्रश्न आग्रहाने मांडा, हा आग्रह त्यांनी धरला. ते म्हणायचे, ‘मी सरकारमध्ये आहे... लोकमत सरकारमध्ये नाही...’ त्यांच्यात ‘मोठ्या मनाचा माणूस’ कायमचा वस्तीला होता. त्यांनी माणूसपण जपले. कधी अहंकार बाळगला नाही. सत्तेची किंवा संपादकपदाची एक गुर्मी असते.... बाबूजींना अशा प्रवृत्तीचा कधी गंधसुद्धा नव्हता. बाबूजी सक्रिय होते त्या काळात काँग्रेसचा कोणीही मुख्यमंत्री असला तरी बाबूजींशिवाय त्यांचे मंत्रिमंडळ बनलेच नाही. याचे कारण गुंतागुंतीच्या कोणत्याही विषयात बाबूजी राजकीय निरगाठी पायाच्या अंगठ्यानेसुद्धा सोडवू शकायचे. बाबूजींनी किती लोकांना, किती सहकाऱ्यांना कशाप्रकारे आणि किती मदत केली, याचा हिशेब नाही. जे केले ते डाव्या हाताचे उजव्या हाताला समजू दिले नाही. एखादी गोष्ट चांगली घडली म्हणून हुरळून गेले नाहीत. मनासारखी गोष्ट झाली नाही म्हणून कधी निराश झाले नाहीत. आयुष्यात त्यांच्याकडून खूप शिकलो... (लेखक लोकमतचे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत)