Join us  

Maharashtra Political Crisis: भाजपा अन् शिंदे गटाची अलिखित छुपी युती होती; एकनाथ खडसेंचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 10:45 AM

पूर्वीपासूनच भाजपासोबत जाण्याची त्यांचा भूमिका होती, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला. ते मुक्ताईनगरमध्ये बोलत होते.

मुंबई/जळगाव- विधानसभेत विश्वासमत सिद्ध करण्याला अवघे काही तास उरले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आघाडी सरकार कोसळले असून देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्यासोबत बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नवे उपमुख्यमंत्री असतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

देवेंद्र फडणवीस हे आपल्याला पाठिंबा असलेल्या आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना गुरुवारी देतील आणि शुक्रवारी (दि.१) फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्यात घडलेल्या या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. भाजपा आणि शिंदे गट यांची अलिखित छुपी युती होती, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. 

एकनाथ खडसे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, भाजपा आणि शिंदे गट यांची अलिखित छुपी युती होती. आजपर्यंतचा इतिहास आहे की, एकनाथ शिंदे यांनी भाजपावर कधीही टीका केली नाही. सरकारमध्ये असताना भाजपाच्या आमदारांची कामे त्यांनी मंजूर केली, त्यामुळे पूर्वीपासूनच भाजपासोबत जाण्याची त्यांचा भूमिका होती, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला. ते मुक्ताईनगरमध्ये बोलत होते.

दरम्यान, ज्यांना सरकार पाडून दाखवण्याचं कंत्राट मिळालं होतं. त्यांनी ते पाडून दाखवलं. आता त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले. तसंच ठाकरे परिवाराला सत्तेची लालसी कधीच नव्हती. पवारांनी विनंती केली म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. आज जे विरोधात बोलत आहेत त्यांच्यापैकी अनेकांचं पालन पोषण शरद पवारांच्या नेतृत्त्वात झालं, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

सरकार २५ वर्षे टिकेल- देवेंद्र फडणवीस

काल दिवसभरात घडलेल्या अनेक घडामोडी आणि कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर रात्री सुप्रिम कोर्टाने बहुमत चाचणी नियोजित वेळेनुसार घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्यातील जनतेला संबोधित करत उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा पराभव झाला म्हणून आपण उन्माद करायचा नाही, असा सल्ला भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिला. ते म्हणाले की, अडीच वर्षांनंतर स्थापन होणारं सरकार २५ वर्षे टिकेल. या संपूर्ण लढाईत भाजपाच्या आमदारांची भूमिका महत्त्वाची होती. तसेच या संपूर्ण घटनाक्रमात निर्णायक भूमिका घेणाऱ्या शिंदे गटातील आमदारांचेही मी आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळएकनाथ शिंदेएकनाथ खडसेमहाराष्ट्र विकास आघाडी