Join us

२०२४ साठी भाजपाची रणनीती ठरली, लोकसभेच्या त्या मतदारसंघांवर विशेष लक्ष, फडणवीसांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 4:44 PM

BJP Politics: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच राज्यातील लोकसभेच्या काही मतदारसंघांवर विशेष लक्ष देण्याची योजना आखली आहे, या संदर्भातील माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतरही सत्तेपासून दूर राहावे लागल्याने भाजपाला मोठा धक्का बसला होता. अनेक वर्ष सोबत असलेला शिवसेनेसारखा मित्र पक्ष दुरावून महाविकास आघाडीच्या रूपात  आव्हान उभे राहिल्याने भाजपाचेमहाराष्ट्रातील राजकारण अडचणीत आले होते. दरम्यान, आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच राज्यातील लोकसभेच्या काही मतदारसंघांवर विशेष लक्ष देण्याची योजना आखली आहे, या संदर्भातील माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकसभेच्या काही जागा निवडल्या आहेत. त्या जागांवर आम्ही अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत. त्यामध्ये महाराष्ट्रातील काही जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील त्या जागांबाबत एक समिती स्थापन करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे त्याचे समन्वयक आहेत. तसेच त्याबाबतच्या बैठकीसाठी केंद्रीय महामंत्री विनोद तावडे हे आले होते. पुढील १८ महिन्यांच्या रणनीतीची चर्चा या बैठकीत झाली. त्यात इत्यंभूत माहिती देण्यात आली. या निवडणुकीसाठी सातत्याने तयारी झाली पाहिजे. लोकांशी संपर्क राहिला पाहिजे. योजनांचा लाभ मिळतोय की नाही याबाबतची चर्चा झाली, असे फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपा ज्या मतदारसंघांवर विशेष लक्ष देणार आहे, त्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याआधी आम्ही जे मतदारसंघ जिंकलो आहोत, त्यावर आम्ही लक्ष देणारच आहोत. त्यासोबतच आम्ही नव्याने जिंकण्यासाठी काही मतदारसंघ निवडले आहे. त्यातील १६ मतदारसंघांव्यक्तिरिक्त अजून ८ मतदारसंघांचीही आम्ही निवड केली आहे. एकंदरीत राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये आम्ही लढून जिंकण्याचा प्रयत्न करू, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, आतापर्यंत शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या आणि आतापर्यंत लढवता न आलेल्या अनेक मतदारसंघांवर भाजपानं लक्ष्य केंद्रित केलं आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, कल्याण मावळ, सातारा, बारामती यासह इतर काही मतदारसंघांचा समावेश आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपामहाराष्ट्रलोकसभा