Join us

 मतदान प्रक्रियेत उपयोगात आणल्या जाणाऱ्या मतदान यंत्रांचे सरमिसळीकरण संपन्न

By मनोहर कुंभेजकर | Published: October 21, 2022 8:27 PM

मतदान प्रक्रियेत उपयोगात आणल्या जाणाऱ्या मतदान यंत्रांचे सरमिसळीकरण संपन्न झाले आहे. 

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील '१६६ अंधेरी पूर्व' या मतदारसंघाची पोटनिवडणूक येत्या दि,३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ही मतदान प्रक्रिया नि:पक्षपणे पार पडण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सर्वस्तरीय कार्यवाही देखील सातत्याने करण्यात येत आहे. याच कार्यवाहीचा भाग म्हणून मतदान प्रक्रियेत उपयोगात येणाऱ्या यंत्रांचे सरमिसळीकरण केले जाते. यानुसार अंधेरी पूर्व या विधानसभा मतदासंघाच्या मतदान प्रक्रियेदरम्यान उपयोगात येणाऱ्या मतदान यंत्रांचे मा.भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार 'द्वितीय सरमिसळीकरण आज करण्यात आले. केंद्रीय निरीक्षक.देवेश देवल यांच्या विशेष उपस्थितीत हे सरमिसळीकरण संपन्न झाले.

अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यवाहीला निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील आणि संबंधित उपस्थित होते. हे सरमिसळीकरण नि:पक्षपणे व्हावे, यासाठी ते भारत निवडणूक आयोगाच्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अजित साखरे यांनी दिली.

या पोटनिवडणूक प्रक्रियेकरिता २५६ मतदान केंद्रे असणार असून या मतदान केंद्रांवर  ३३३ बॅलेट युनिट, ३३३ कंट्रोल युनिट आणि ३५९ व्हीव्हीपॅट यंत्रे उपयोगात आणली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघात जेवढ्या यंत्रांची आवश्यकता आहे, त्यापेक्षा सुमारे २० टक्के अतिरिक्त बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट आहेत. तर सुमारे ३० टक्के अतिरिक्त व्हीव्हीपॅट यंत्रांची तजवीज करण्यात आली आहे. जेणेकरून कोणत्याही यंत्रामध्ये काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास पर्यायी यंत्रांची व्यवस्था सहजपणे होऊ शकेल. मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान उपयोगात येणारी यंत्रे ही सशस्त्र सुरक्षादलाच्या व कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. तसेच सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे २४ तास देखरेख देखील ठेवण्यात येणार आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी  निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोटनिवडणुकीबाबतची विविध स्तरीय प्रक्रिया निर्धारित वेळापत्रकानुसार वेळच्यावेळी करण्यात येत आहे. यानुसार अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याद्वारे सातत्याने विविध स्तरीय कार्यवाही अव्याहतपणे करण्यात येत आहे. यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन आणि तेथील अधिकारी व कर्मचारी हे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देखील कार्यरत राहणार आहेत. येत्या ३ नोव्हेंबर रोजी मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क जरूर बजावावा आणि लोकशाही प्रक्रिया अधिकाधिक सुदृढ करावी असे आवाहन निधी चौधरी यांनी केले आहे.

 

टॅग्स :मुंबईअंधेरीशिवसेनानिवडणूक