मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १० आणि ११ वर २४ डब्यांच्या लोकल थांबविता याव्यात यासाठी फलाटांच्या विस्तारी करणाकरिता शुक्रवारी मध्यरात्री १२.३० सुरु झालेल्या ब्लॉकने शनिवारी प्रवाशांचे वाईट हाल केले. भायखळा ते सीएसएमटीदरम्यान बंद असलेल्या लोकल सेवेमुळे बेस्टवर ताण पडला तर दुसरीकडे बहुतांशी लोकल या परळ आणि दादरपर्यंत चालविण्यात आल्याने प्रवाशांची दमछाक झाली. दरम्यान, हा ब्लॉक रविवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याने प्रवाशांचे होणारे हाल आजही कायम राहणार आहेत.
ठाणे येथील ५ आणि ६ आणि सीएसएमटी येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी तीन दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. ठाणे येथील कामामुळे गुरुवारी रात्री १२.३० पासूनच ब्लॉक सुरु झाला आहे. तर सीएसएमटी येथील येथील कामासाठी शुक्रवारी रात्री १२.३० पासून ब्लॉक सुरु झाला. या दोन्ही ब्लॉकमुळे एकूण ९३० लोकल फे-या रद्द करण्यात आल्या असून, यात शनिवारच्या ५३४ फे-यांचा समावेश होता. तर रविवारी २३५ लोकल फे-या रद्द करण्यात आल्या आहेत.
शनिवारी रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे ब्लॉक चालविण्यात आल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. ब्लॉक काळात प्रवाशांनी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडावे किंवा घरून काम करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले होते. मात्र तरिही बहुतांशी मुंबईकर घराबाहेर पडल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. शनिवारी सकाळपासून लोकल ३० मिनिटांहून अधिक काळ विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रत्येक लोकल प्रवाशांनी तुडूंब भरून वाहत होती.
मुलुंड, विक्रोळी, कांजुरमार्ग, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, सायन, माटुंगा, दादर आणि परळ या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती. रेल्वे स्थानकांवर किंवा लोकल गाड्यांमध्ये ब्लॉकची घोषणा होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात्र मात्र कोणत्याच रेल्व स्थानकांवर अशा घोषणा होत नव्हत्या. त्यामुळे नव्या प्रवाशांना ब्लॉकबाबत माहितीच नव्हते. त्यामुळे त्यांना ब्लॉकचा प्रचंड मनस्ताप झाला.
मध्य रेल्वेने भायखळयापर्यंत लोकल चालवितानाच बहुतांशी लोकल या परळ आणि दादरपर्यंत चालविल्या. त्यामुळे प्रवाशांच्या त्रासात भर पडली. सर्वच रेल्वे स्थानकांवरील इंडीकेटरवर सीएसएमटी असा बोर्ड लागला होता. प्रत्यक्षात येणा-या लोकल परळ किंवा दादरपर्यंत चालविल्या जात होत्या. काही लोकलच्या दर्शनी भागावर सीएसएमटी असे लिहले असले तरी त्या लोकलही परळपर्यंत चालविल्या जात होत्या. या लोकलमध्ये यासंदर्भातील घोषणा अपेक्षित असताना प्रवाशांना काहीच माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे भायखळ्यापर्यंत प्रवास करणा-या प्रवाशांना परळ किंवा दादरला उतरावे लागत होते. नवे प्रवासीशनिवारी लोकलने प्रवास करणारे बहुसंख्य प्रवासी हे दररोजचे नव्हते. एकतर पर्यटक किंवा कुटूंबासमावेत घराबाहेर पडलेले हे प्रवासी लोकल प्रवास करत होते. त्यांना ब्लॉक बाबत पुरेशी माहिती नसल्याने पोराबाळांसोबत त्यांची तारांबळ उडाली होती. लोकल कुठंपर्यंत...काही लोकल कुर्ल्यापर्यंत चालविल्या जात होत्या. त्यामुळे प्रवाशांना कुर्ल्याला उतरून पुन्हा दादर, परळ किंवा भायखळा गाठावे लागत होते. मात्र हा प्रवास करताना प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होत होता. बेस्टला गर्दीभायखळ्यापर्यंत लोकल चालविण्यात आल्याने येथून पुढे फोर्ट गाठण्यासाठी प्रवाशांना बेस्ट सेवाचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे बेस्टला तुफान गर्दी होती. दिवसभर बेस्टच्या गर्दीचा फेरा सुरु होता. प्रवाशांचा निघाला घाममुंबईत रोजच्या तुलनेत शनिवारी भरपूर ऊकाडा आणि ऊनं होते. त्यामुळे रेल्वेचा प्रवास करताना भर दुपारी प्रवाशांचा घाम निघत होता.