एक उंदीर मारण्यासाठी पालिका मोजते २२ रुपये; ४ महिन्यांत १ लाखाहून अधिक उंदरांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 12:28 PM2023-05-05T12:28:03+5:302023-05-05T12:28:22+5:30
या कार्यवाही अंतर्गत ॲल्युमिनिअम फॉस्फाईडच्या गोळ्यांचा वापर करून उंदरांना मारले जात असल्याची माहिती आहे.
मुंबई : लेप्टोस्पायरेसिस नियंत्रणाच्या दृष्टीने पालिकेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या अनुषंगानेच पुरेसे उंदीर पकडण्यासाठी सापळ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेत उंदीर पकडण्यासाठीचे काम हे १७ विभागीय कार्यालयात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येत असून जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत पालिकेने तब्बल १ लाख ८५ हजार २७० उंदीर मारले. एक उंदीर मारण्यासाठी पालिका २२ रुपये मोजते, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
याअंतर्गत पाणी साचत असलेल्या ठिकाणांची यादी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून प्राप्त केली आहे. या ठिकाणी मूषकांच्या संख्येत घट करण्याच्या दृष्टीने प्रत्येक महिन्यात औषधी गोळ्यांचा वापर करून कार्यवाही केली जात आहे. उंदीर पकडण्यासाठी पुरेशा सापळ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेत उंदीर पकडण्यासाठीचे काम हे १७ विभागीय कार्यालयात राबविण्यात येत आहे.
या कार्यवाही अंतर्गत ॲल्युमिनिअम फॉस्फाईडच्या गोळ्यांचा वापर करून उंदरांना मारले जात असल्याची माहिती आहे. पावसाळ्याआधी प्रत्येक ठिकाणी तीन ते चार वेळा ही मोहीम राबवली जाते, मात्र पावसाळ्यात ही मोहीम बंद असते. मात्र, ज्यावेळी दोन ते चार दिवस पाऊस पडत नाही, त्यावेळी पुन्हा गोळ्यांचा वापर केला जातो.
कीटकनाशक विभाग सज्ज
लेप्टो, मलेरिया, एच-वन एन-वन, गॅस्ट्रो, हेपेटायसिस आणि डेंग्यू या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेचा कीटकनाशक विभाग सज्ज झाला आहे. साचलेल्या पाण्यात उंदीर, गायी, म्हशी, घोडे, कुत्रे आणि मांजर यांचे मलमूत्र असल्यास आणि त्याचा संपर्क जखम असलेल्या व्यक्तीबरोबर आल्यास अशा व्यक्तीला लेप्टोचा संसर्ग होतो. त्यामुळे कीटकनाशक विभागामार्फत आवश्यक ती तयारी केली जात आहे.