कागदावर कुठे नालेसफाई होते का..? नाल्यांमध्ये अजुनही थर्माकॉल, प्लास्टिक पिशव्यांचा खच तसाच
By सीमा महांगडे | Published: May 29, 2024 09:43 AM2024-05-29T09:43:08+5:302024-05-29T09:49:27+5:30
वॉर्ड ऑफिसर ऑन फिल्ड आहेत तर नाल्यात कचऱ्याचे ढीग अजूनही तसेच कसे..?
सीमा महांगडे, मुंबई : मुंबई महापालिकेने मॉन्सूनपूर्व नालेसफाईचे काम युद्धपातळीवर हाती घेतल्याचा दावा केला आहे. शहर विभाग, पूर्व व पश्चिम उपनगरे, महामार्ग, छोटे नाले तसेच मिठी नदीतून १० लाख मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले होते. मंगळवारपर्यंत या सर्व ठिकाणांहून ११ लाख २३ हजार ४ मेट्रिक टन गाळ काढून १०० टक्के उद्दिष्ट गाठल्याचा दावा पालिकेने वेबसाईटवर केला. असे असताना मुंबईत आजही ठीक ठिकाणी नाल्यांमध्ये असणारा हजारो टन कचरा अजूनही जैसे थे कसा?
महापालिकेने सफाई केली असेलही. मात्र जो कचरा आजही अनेक नाल्यांमध्ये आहे, त्याची जबाबदारी कोणाची? वॉर्ड ऑफिसरला फिल्डवर राहिले पाहिजे, अशी सक्ती करण्यात आली असताना हे चित्र असेल तर वॉर्ड ऑफिसर ऑफिसमध्ये बसले तर काय होईल हा मुंबईकरांपुढे प्रश्न आहे. ज्याची उत्तरे महापालिकेला द्यावी लागतील.
अंधेरीतील आझादनगर नाला, वांद्रे येथील भारतनागर नाला, बोरिवली येथील दाैलतनगर नाला, गोरेगाव पश्चिमेतील लिंक रोड नाला, दहिसर येथील एन. एन. काॅम्प्लेक्स नाला, विलेपार्ले पश्चिम नेहरूनगर येथील नाल्यांतील गाळ, कचरा पाहिला की पालिकेची नालेसफाई नेमकी झाली कुठे? आजही एक दोन ठिकाणी नाल्यांमध्ये सफाई चालू असल्याचे चित्र होते. मात्र त्यासाठी पुरेसे कर्मचारीही आजूबाजूला दिसत नव्हते.
नाल्याच्या तोंडाशी सफाई-
१) पावसाळ्याला आता काहीच दिवस उरले असताना आता नाल्यांच्या मुखाशी असलेला गाळ काढणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे अधिकारी सांगतात मात्र नाल्यांच्या मुखाशी साचणाऱ्या गाळामुळे आणि तरंगत्या कचऱ्यामुळे पाणी तुंबण्याची आणि पुराची परिस्थिती निर्माण होते, त्याचे काय?
२) नाल्याच्या तोंडाशी असलेला गाळ काढून टाकायचा आणि जुना गाळ तसाच ठेवायचा. तो भर पावसात वाहून नाल्याच्या तोंडाशी येणार, आणि नाले बंद पडणार. मग असे दाखवेगिरीचे उद्दिष्ट महापालिकेने का ठेवले? असा प्रश्न केला तेव्हा त्याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नव्हते.
‘अजूनही येथे सफाईला सुरुवात नाही’-
घाटकोपर-विद्याविहार पूर्व येथील ‘सोमय्या’ नालाही सध्या कचऱ्याने पूर्णपणे भरला आहे. तेथेही अजून सफाईला सुरुवात झालेली नाही. परिणामी पावसाळ्यात नाल्यालगत असलेल्या चित्तरंजन कॉलनी, एमआयजी कॉलनी, शास्त्रीनगर, जवाहरनगर, मोहननगर, राजावाडी सीबीसी महापालिका शाळा, राजावाडी रुग्णालय परिसर आदी ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ येथील नाल्याची सफाई करावी, अशी मागणी उद्धवसेनेचे कार्यकर्ते प्रकाश वाणी यांनी केली आहे.
‘आकडेवारी उद्दिष्ट नाही’-
नाल्यांतील गाळ काढणे ही नालेसफाईची महत्त्वाची बाजू असली तरी नाल्यातील अपेक्षित वजनाचा गाळ काढला म्हणजे पूर्ण नालेसफाई झाली असे नाही. त्यासाठी त्या नाल्याचा संपूर्ण ‘स्ट्रेच’ स्वच्छ होणे आवश्यक आहे. याच सूचना अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्या असून, त्याप्रमाणे नालेसफाईचे काम सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली असली तरी प्रत्यक्षात तसे काही घडत असल्याचे दिसत नाही.
टीकेचा सूर...
नालेसफाईच्या कामांवर विरोधकांसह भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदारांना होणारा दंड हा केवळ कागदावर असून सरकारचे लागेबांधे असल्यामुळे तोही वसूल होईल की नाही, यावर उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ही प्रश्न उपस्थित केला आहे.
तरंगता कचरा जास्त -
नाल्यांमध्ये थर्माकॉल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॅपर्स असा विविध तरंगता कचरा भरती-ओहोटीमुळे नाल्यात शिरणाऱ्या समुद्राच्या व खाडीच्या पाण्याबरोबर तरंगत्या वस्तू आजही अनेक नाल्यांमध्ये तशाच आहेत.
शहर, उपनगरात भरती-ओहोटीच्या प्रवाहाने बाधित होणाऱ्या व झोपडपट्टीतून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये हलक्या वजनाच्या वस्तूंचा कचरा नाला तळापासून गाळ उपसून स्वच्छ केल्यानंतरही दिसून येतो. कितीही गाळ काढला तरी तरंगत्या कचऱ्यामुळे नालेसफाई झालीच नाही, असे चित्र उभे राहते. त्यामुळे नाल्याशेजारी राहणाऱ्यांनी नाल्यात कचरा टाकू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.