मालमत्ता कर थकबाकीदारांना मुंबई पालिकेचा दणका; ४४ कोटी रुपयांची दंडवसुली 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 09:37 AM2024-06-19T09:37:49+5:302024-06-19T09:38:57+5:30

मालमत्ताकराची थकीत रक्कम न भरणाऱ्यांकडून मुंबई महापालिकेने दोन टक्के दंड आकारण्यास सुरुवात केली आहे.

the bmc has collect property tax from defaulters of rs 44 crore in mumbai | मालमत्ता कर थकबाकीदारांना मुंबई पालिकेचा दणका; ४४ कोटी रुपयांची दंडवसुली 

मालमत्ता कर थकबाकीदारांना मुंबई पालिकेचा दणका; ४४ कोटी रुपयांची दंडवसुली 

मुंबई : मालमत्ताकराची थकीत रक्कम न भरणाऱ्यांकडून मुंबई महापालिकेने दोन टक्के दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत एक लाख नऊ हजार २३४ थकबाकीदारांना हा दंड ठोठावत त्यांच्याकडून ४३ कोटी ९९ लाख रुपयांचा दंड वसूल केल्याचे पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाकडून सांगण्यात आले.
यंदाच्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२४-२५ म्हणजेच ३१ मार्चपर्यंत मालमत्ताकराची थकीत रक्कम भरण्यासाठी पालिकेने २५ मेपर्यंत मुदत दिली होती. २५ मेपर्यंत थकीत रक्कम न भरल्यास दोन टक्के दंड आकारण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला होता. मात्र, पालिकेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे थकबाकीदारांना चांगलेच महागात पडले आहे. 

२०२४-२५ चालू आर्थिक वर्षात थकीत रक्कम न भरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने एक लाख नऊ हजार २३४ मालमत्तांवर अधिनियमातील तरतुदीनुसार कलम २०२ अन्वये ४३ कोटी ९९ लाख रुपये दंडापोटी वसूल केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

१०८ टक्क्यांपेक्षा अधिक कर जमा-

मालमत्ता कर थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याचा इशारा देताच थकीत कर भरण्यासाठी मालमत्ताधारकांची झोप उडाली होती. पालिकेच्या इशाऱ्यानंतर २५ मे या मुदतीत तब्बल चार हजार ८५६.३८ कोटींचा मालमत्ता कर जमा झाला. चार हजार ५०० हजार कोटींचे टार्गेट असताना ३५६.३८ कोटी अधिक जमा झाले असून १०८ टक्के अधिकचा कर जमा झाल्याचे पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाकडून सांगण्यात आले.

मुदतवाढ देऊनही दुर्लक्ष -

१)  जकात बंद झाल्यानंतर मालमत्ता कर हाच पालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. २०२४-२५ मधील मालमत्ता कर भरण्यासाठी २६ फेब्रुवारीपासून बिले पाठविण्यास सुरुवात केली आणि ३१ मार्च २०२४ पर्यंत ४५०० कोटींच्या करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. 

२)  बिले उशिराने पाठविल्याने ३१ मार्चपर्यंत कर भरणा करणे शक्य नसल्याने २५ मे २०२४ ही अखेरची मुदत दिली होती. मालमत्ताधारकांनी दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले होते. मात्र एक लाखाहून अधिक मालमत्ताधारकांनी दुर्लक्ष केल्याने दोन टक्के दंड आकारण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: the bmc has collect property tax from defaulters of rs 44 crore in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.