मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे सरकारी यंत्रणांकडून होणारी विविध स्वरुपाची थकबाकी वसुली मोहीम सध्या ठप्प पडली आहे. मात्र, मुंबई महापालिकेला स्वस्थ बसून चालणार नाही. निर्धारित वेळेत वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी पालिकेची धावाधाव सुरू आहे. ही वसुली आहे, मालमत्ता कराची! त्यामुळे संपूर्ण राज्यात फक्त पालिकाच जोरात असल्याचे दिसते.
लोकसभा निवडणुकीमुळे सरकारच्या विविध यंत्रणा आणि त्यातील बहुसंख्य मनुष्यबळ निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. पालिकेचाही मोठा कर्मचारी वर्ग निवडणुकीच्या कामात आहे. मात्र करनिर्धारण आणि संकलन खात्यात धामधूम सुरू आहे. २५ मे पूर्वी मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. आधीच ३१ मार्चपूर्वी निश्चित केलेले लक्ष्य गाठण्यात यश आलेले नाही. आता २५ मे ही कर भरण्याची शेवटची तारीख आहे. साहजिकच पालिका वेगवान हालचाली करत आहे. खुद्द आयुक्तांनी मालमत्ता कर वसुलीच्या कामात लक्ष घातले आहे. नुकतीच त्यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कर वसुलीसाठी काही सूचना केल्या होत्या.
मुदत संपण्यास काही दिवसच शिल्लक-
१) नोटीस पाठवूनही कर भरणा होत नसल्याने पालिकेने आता थेट कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नोटिसा देऊनही ज्यांनी कर भरला नाही, त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे.
२) त्यानंतर कर भरणा करण्यासाठी काही दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीतही कर न भरल्यास मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. पालिकेच्या कारवाईमुळे अनेकजण ताळ्यावर येऊ लागले आहेत.
३) काहींनी तर पालिकेचे पथक येताच लगोलाग कर भरणा केलेला आहे. २५ मे ही मुदत संपण्यास आता काही दिवसच शिल्लक आहे. तरीही अजून बड्या थकबाकीदारांनी कर भरणा केलेला नाही. त्यांच्यावर पालिका काय कारवाई करते, हे पाहणे अैात्सुक्याचे ठरणार आहे.