मुंबई : कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणारा पहिला महाकाय गर्डर (बो आर्क स्ट्रिंग) बसविण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आले. समुद्रातील भरती-ओहोटीचा अंदाज घेऊन १ तास २५ मिनिटांत हे मिशन फत्ते करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.
कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत भारतातील हा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरल्याने महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी आयुक्तांसह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी गगराणी यांनी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प पथकाचे अभिनंदन केले.
पुढील टप्प्यातही कामे होणार-
कोस्टल रोड प्रकल्पातील वरळीकडील बाजू, वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची कोस्टल रोडला मिळणारी बाजू येथे प्रत्येकी दोन मेटींग कोन आणि दोन मेटींग युनिट बसविण्यात आले आहेत. या मेटींग कोन, युनिटची सांगड बसविण्यात आली आहे. हे मेटींग युनिट २ मीटर व्यास आणि मेटींग कोन १.८ मीटर व्यासाचे आहेत. यानंतर मेटींग कोन आणि युनिट असलेल्या चारही कोपऱ्यांवर जॅक बसविण्यात येतील. जॅक कार्यान्वित केल्यानंतर मेटींग कोन आणि युनिट काढून घेण्यात येणार आहेत. पुढच्या तांत्रिक प्रक्रियेत बेअरिंगचा वापर करून त्यावर गर्डर स्थिरावणार आहे.
गर्डरचा अंबाला ते मुंबई प्रवास-
हा महाकाय गर्डर वरळीकडून नरिमन पाईंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात आला आहे. गर्डर २ हजार मेट्रिक टन वजनाचा असून, १३६ मीटर लांब आणि १८ ते २१ मीटर रुंद आहे. अंबाला (हरियाणा) येथे या गर्डरचे छोटछोटे सुटे भाग तयार करण्यात आले आहेत. तेथून तब्बल ५०० ट्रेलरच्या मदतीने हे सुटे भाग दाखल आले. सुटे भाग एकत्र जोडून नवी मुंबईतील न्हावा बंदरातून तराफाच्या मदतीने गर्डर वरळी येथे आणला.
संयम, कौशल्य पणाला लावणारी ती वेळ-
१) पहाटे २ वाजल्यापासून गर्डर स्थापनेची कार्यवाही सुरू झाली. सागरी लाटांचा आणि वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेत अभियंत्यांनी गर्डरला स्थिर केले.
२) कोस्टल रोडच्या कडेला दोन आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाच्या कडेला दोन असे चार मेटींग युनिट तयार करण्यात आले आहेत.
३) त्या मेटींग युनिटमध्ये गर्डरचे चारही कोपऱ्यांना असलेले पांढऱ्या रंगाचे मेटींग कोन ठिक ३ वाजून २५ मिनिटांनी अचूकपणे बसविण्यात आले.
४) चारही मेटींग कोन आणि मेटींग युनिटची सांगड बसताच उपस्थित अधिकारी, अभियंते आणि कामगारांनी ‘हिप हिप हुर्रे’ म्हणत आणि टाळ्यांचा गजरात मोहीम फत्ते झाल्याचा आनंद व्यक्त केला.