बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी पालिका मेट्रोच्या धर्तीवर बांधणार कास्टिंग यार्ड
By जयंत होवाळ | Published: January 16, 2024 08:10 PM2024-01-16T20:10:01+5:302024-01-16T20:10:05+5:30
दहिसर - वर्सोवा लिंक रोड प्रकल्पात कास्टिंग यार्ड उपलब्ध करून न दिल्यामुळे कंत्राटदाराला २५६ कोटी रुपये द्यावे लागतील
मुंबई : मुंबई महापालिकेचे सध्या विविध प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्याचे ने - आण सुरू असते. हे साहित्य ठेवायचे कुठे, असा प्रश्न पालिकेला पडलेला आहे. त्यामुळे पालिकेने आता मेट्रोच्या धर्तीवर कास्टिंग यार्ड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बांधकाम साहित्य सुरक्षित ठेवणे शक्य होईल.
दहिसर - वर्सोवा लिंक रोड प्रकल्पात कास्टिंग यार्ड उपलब्ध करून न दिल्यामुळे कंत्राटदाराला २५६ कोटी रुपये द्यावे लागतील. दहिसर ते भाईंदर उड्डाणपूल प्रकल्पासाठी पालिकेने २२४ कोटी रुपये दिले आहेत. गोरेगाव - मुलुंड लिंक रोड प्रकल्पात गोरेगाव फिल्मसिटी ते भांडुप खिंडीपाडा दरम्यान दोन बोगदे बांधण्यासाठी पालिकेने कास्टिंग यार्डसाठी कंत्राटदाराला १३४ कोटी रुपये दिले आहेत. पालिकेचे सुमारे १८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्रकल्प सुरू आहेत.
कास्टिंग यार्ड कशासाठी ?
एखाद्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य लागते. हे साहित्य शक्यतो प्रकल्पस्थळी असावे लागते. ते ठिकाण प्रकल्पस्थळापासून दूर असेल तर वाहतूक खर्चात आणि एकूणच प्रकल्प खर्चात वाढ होते. शिवाय बांधकाम साहित्य उघड्यावर असेल तर चोरी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कास्टिंग यार्ड महत्वाचे ठरते. मेट्रोच्या सर्व प्रकल्पात अशा प्रकारचे कास्टिंग यार्ड आहेत. कास्टिंग यार्ड नसल्याने अंधेरीतील गोखले पूल, विद्याविहार पूल , सीएसएमटी येथील हिमालय पूल या प्रकल्पाची साधन सामग्री ठेवण्यासाठी पालिकेला जागेची अडचण जाणवली होती.
पालिकेच्या जागांचा वापर नाही.
पालिकेच्या अनेक मोकळ्या जागांवर अतिक्रमण झाले आहे. या जागा ताब्यात घेऊन तिथे कास्टिंग यार्ड उभारणे शक्य होते. मात्र त्याएवजी भाड्याच्या जागा कास्टिंग यार्डसाठी घेतल्या जाणार आहेत. खाजगी जमीन मालक, कंपन्या आणि बांधकाम व्यावसायिकांकडून त्यांच्या मोकळ्या जागा पालिका तीन वर्षासाठी भाड्यावर घेणार आहे.