मुंबईसह महाराष्टाला हादरवरुन टाकणारी बोट नेमकी कशी भरकटली?; नेमकं काय घडलं, पाहा घटनाक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 07:59 AM2022-08-22T07:59:41+5:302022-08-22T08:00:20+5:30
या प्रकरणी एटीएसने केलेल्या तपासात बोट समुद्र किनाऱ्यापासून सुमारे १०० मीटर पाण्यात होती.
दिघी- हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर सापडलेली बोट अद्यापही रेतीमध्येच अडकून पडलेली आहे. ही बोट बाहेर काढण्यासाठी मागील चार दिवसांपासून सुरु असलेले शर्थीचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. याबाबत आतापर्यंत समोर आलेले नाही, अशे रायगड पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रविवारी त्याबाबत प्रसिद्धीपत्रक काढून आतापर्यंतच्या तपासाची माहिती देण्यात आली.
हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर १८ ऑगस्टला सकाळी आढळून आलेल्या संशयित बोटीत एके ४७ मॉडेलच्या ३ रायफल्स आणि एकूण २४७ काडतुसे आढळली. घातपाताच्या उद्देशाने हा शस्त्रसाठी पाठवला का? ही शक्यता असल्याने स्थानिक पोलिसांसह एटीएस, गुप्तवार्ता विभाग तसेच भारतीय नौसेना, कस्टमच्या वरिष्ठ अधिकारी यांनी भेट देऊन बोटीची पाहणी केली.
या प्रकरणी एटीएसने केलेल्या तपासात बोट समुद्र किनाऱ्यापासून सुमारे १०० मीटर पाण्यात होती. स्थानिकांच्या मदतीने बोटीपर्यंत पोहोचल्यावर पाहणी केली असता बोटीमध्ये काही कागदपत्रे आणि काळ्या रंगाच्या पेटीत रायफल हाेती.
अशी भरकटली बोट-
- कॅप्टन जॉन ग्रेटविच आणि त्यांचे सहकारी हे २६ जूनला मस्कतवरून युरोपकडे जात होते. ओमानजवळ या बोटचे इंजिन बंद पडले.
- त्यानंतर कोरियन नेव्हीच्या बोटीने या क्रू मेंबर्सना बोटीवरून सुरक्षित वाचवले. मात्र समुद्राच्या भरतीमुळे बोट ओमानच्या किनाऱ्यावर नेता आली नाही.
- पुढे ही बोट भरकटल्याने १८ ऑगस्टला हरिहरेश्वर किनाऱ्याजवळ येऊन थांबल्याचे तपासातून स्पष्ट झाले.
- अजूनही ही बोट रेतीमध्ये हरिहरेश्वरच्या किनाऱ्याजवळ रुतलेली आहे. मात्र बोटीवरील साहित्य एटीएसने ताब्यात घेतले आहे. त्याची तपासणी करण्यात आली असून त्यात काहीही संशयास्पद, आक्षेपार्ह आढळलेले नाही.
- अद्यापपर्यंत झालेल्या चौकशीतून या प्रकरणामागे दहशतवादाचा कोणताही पैलू दिसून येत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.