Join us  

अंगाला खाज येतेय, गंभीर आजाराचे असू शकते लक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 2:25 PM

वेळेतच तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणे फायद्याचे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: त्वचेच्या काही भागावर खाज येणे खूप मूलभूत समस्या आहे. बहुतांश डॉक्टरांकडे रुग्ण या समस्या घेऊन येत असतात. मात्र, खाज येण्याची वेगवेगळी करणे असू शकतात. त्यामुळे त्वचेवर खाज आली आहे आणि अनेक दिवस ती जात नसेल तर ती एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकवेळा खाज आल्यावर घरच्या घरी उपाय केले जातात किंवा मेडिकलमध्ये जाऊन स्वतःच मलम घेऊन येतात. मात्र, अनेकवेळा असे उपाय केल्यानंतरही खाज जात नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही फायदेशीर ठरू शकते. कोरडी त्वचा किंवा त्वचा ओलसर राहिल्यास खाज येत असते. अंगावर खाज येण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यामुळे त्याचे निदान करून सल्ला घेणे गरजेचे असते. अनेकवेळा नागरिकांच्या मनात समज असतो की खाज आली म्हणजे काही तरी ॲलर्जी किंवा किडा चावला असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

निदान रक्ताच्या चाचण्या, एक्सरे  करून या आजाराचे निदान करणे सहज शक्य असते. डॉक्टर लक्षणे बघून रक्ताच्या नेमक्या चाचण्या करायचे हे ठरवित असतात. 

लक्षणे 

  • शरीराच्या विविध भागावर खाज येणे 
  • तसेच काही वेळा फक्त पायावर किंवा हातावर खाज येते 
  • काही वेळा फक्त छातीवर लाल पुरळ उठतात 
  • साधे प्रयत्न करूनही खाज जात नाही 
  • अस्वस्थ वाटणे, कामात लक्ष न लागणे
  • ... मग धावपळ करतात

त्यामध्ये विशेष करून मधुमेह, कॅन्सर, मूत्राशयाचे आजार, कावीळ या आजाराची सुरुवात होताना अनेकवेळा अंगावर खाज सुटते. सर्वसामान्य नागरिक या आजाराचा कधी विचारही करत नाही. मग अगदी आजार बळावल्यावर डॉक्टरांकडे जाण्याची धावपळ सुरू करतात. त्यापेक्षा आजाराच्या सुरुवातीलाच जर या एखाद्या गंभीर आजाराचे निदान डॉक्टरांकडून करून घेतल्यास त्या आजारावर उपचार करून आजारावर नियंत्रण मिळविणे सोपे होते. 

कारणे

  • कोरडी त्वचा
  • खाण्यातून झालेली ॲलर्जी 
  • मूत्राशय मार्गातील संसर्ग
  • कावीळ 
  • पचनसंस्थेतील बिघाड 
  • कीटक किंवा डासांचा चावा 

त्वचेवर खाज येणे ही सामान्य समस्या वाटत असली तरी अनेक गंभीर आजाराच्या सुरुवातीची लक्षणे असल्याची शक्यता नाकारता येत नाही. काही येणारी खाज दोन दिवसात बरी होते. मात्र, जी खाज अनेक दिवस राहत असेल तर त्याचे निदान करून त्यावर योग्य ते उपाय करणे गरजेचे असते. आमच्या ओपीडीमध्ये अनेक असे रुग्ण आम्ही रोज पाहत असतो. त्या रुग्णांशी सविस्तर बोलल्यावर त्यांच्या आरोग्याची सर्व माहिती घेतल्यावर लक्षणे जाणून घेतल्यानंतर आपणास अंदाज येतो. त्या रुग्णाला कोणत्या प्रकारचा आजार असण्याची शक्यता आहे. त्याकरिता आणखी काही रक्ताच्या चाचण्या करून आम्ही त्या रुग्णावर उपचार करतो.- डॉ. विनायक सावर्डेकर, सहयोगी प्राध्यापक, सेंट जॉर्जेस रुग्णालय

टॅग्स :आरोग्य