मुंबई : राम मंदिर रेल्वे रुळावर एका व्यक्तीचा मृतदेह रेल्वे पोलिसांना होळीच्या दिवशी सापडला होता. त्याची ओळख आठ दिवसांनंतर पटली असून भोला तुरी (३०) असे त्याचे नाव आहे. तो गोरेगावच्या एका हॉटेलमध्ये चायनीज बनविणारा कुक म्हणून काम करायचा. त्याच्या मृतदेहावर काही जखमा आढळल्याने त्याची हत्या झाल्याचा संशय बोरिवली रेल्वे पोलिसांना असून अधिक तपास करीत आहेत. तुरी हा १८ मार्चपासून बेपत्ता झाला. रेल्वे पोलिसांकडून मृत्यू झाल्याचे समजले. गोरेगाव पूर्वच्या अन्नदाता आहार केंद्र याठिकाणी तो काम करीत होता.
घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळालेले नाही. स्टेशन मास्तरने सांगितले की, तुरी हा एक्स्प्रेस समोर आला. त्याने आत्महत्या केली किंवा रुळ ओलांडताना मृत्यू झाल्याचा संशय आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यू जखमांमुळे झाल्याचे नमूद करण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी दिली.