Join us  

मुलगा शाळेत जातोय; पण, त्याला येतंय किती? स्लॅस सर्वेक्षण तूर्तास संपामुळे पुढे ढकलले

By सीमा महांगडे | Published: March 19, 2023 1:05 PM

राज्यात तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे ‘स्लॅस’चे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत मार्चच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आले आहे.

मुंबई : कोरोना काळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले होते. राज्यातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वेक्षण (नॅस) करण्यात आले होते. याच धर्तीवर मार्च महिन्यात राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (स्लॅस) शिक्षण विभागातर्फे करण्यात येणार आहे. मात्र, मुंबईत तरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे होणारे स्लॅस सर्वेक्षण तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे. संप मिटल्यानंतर लगेचच सर्वेक्षणाची तारीख ठरवली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे.

राज्यात तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे ‘स्लॅस’चे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत मार्चच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण मराठी माध्यमाच्या प्रथम भाषा मराठी व गणित या विषयांचे करण्यात येणार आहे. राज्यभरातील इयत्ता तिसरीच्या ३ हजार ७५६, पाचवीच्या ४ हजार ५० तर आठवीच्या ४ हजार १२७ शाळांमध्ये स्लॅस सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील एकूण ११ हजार ९३३ शाळांमध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे. मुंबई शहरात ९९ शाळांमध्ये तर पालिका शिक्षण विभागाच्या ९५ शाळांमध्ये हे सर्वेक्षण होणार आहे.

विद्यार्थ्यांना काय येते, हे समजणार? तिसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ९० मिनिटांमध्ये प्रत्येकी ४५ प्रश्नांकित विषय असतात. तर आठवीसाठी १२० मिनिटांमध्ये ६० प्रश्न असतात. विद्यार्थ्यांच्या वर्तमान संपादणूक पातळीची तपासणी केली जाते.

स्लॅस सर्वेक्षणाचा उद्देश  तिसरी, पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी भाषा विषय आणि गणित यासंबंधी विद्यार्थ्यांचे ज्ञान तपासले जाणार आहे.   त्यात विद्यार्थ्यांना अध्ययन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी समजून घेणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.   ‘स्लॅस’ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने निवडण्यात आलेल्या शाळेचा पट, माध्यम यांची पडताळणी करून मुंबईतील शाळांमध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे.   सर्वेक्षणाच्या अनुषंगाने निवडण्यात आलेल्या शाळेचा पट, माध्यम यांची पडताळणी करून तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, मनपा स्तरावर शिक्षण अधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविली जाणार आहे. हे सर्वेक्षण कधी घेणार, याची लवकरच माहिती दिली जाणार आहे.

टॅग्स :शिक्षण