नवरीच निघाली ठग, खंडणीसाठी नवऱ्याला केले ब्लॅकमेल; फसवणुकीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 10:30 AM2024-05-28T10:30:55+5:302024-05-28T10:33:11+5:30
लग्न उरकताच आधी दमदाटी करत घरातील पैसे, वस्तूंवर हात साफ करायला सुरुवात केली.
मुंबई : चाळीस वर्षांची असतानाही १८ वर्षे वय असल्याचे सांगून लग्नाच्या जाळ्यात ओढले. लग्न उरकताच आधी दमदाटी करत घरातील पैसे, वस्तूंवर हात साफ करायला सुरुवात केली. चोरी पकडताच नवरीने गावी धाव घेत नवऱ्याविरुद्ध तक्रार दिली. तक्रार मागे घेण्यासाठी ब्लॅकमेलिंग सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार मस्जिद बंदर परिसरात समोर आला आहे. वृद्धेच्या तक्रारीवरून आरएके मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
मस्जिद परिसरात राहणाऱ्या ६६ वर्षीय तक्रारदार मैसरजहाँ फकिरा मोहम्मद शेख यांच्या तक्रारीनुसार, २०२२ मध्ये मुलासाठी स्थळ शोधत असताना आरोपी चंद्रा हिच्या संपर्कात आले. तिने उत्तर प्रदेश येथील तरन्नुम जहाँ नावाच्या मुलीचे स्थळ सांगितले. त्यांनीही लग्नासाठी होकार दिला. तिने स्थळाच्या बदल्यात कमिशन म्हणून ८० हजार रुपये उकळले. लग्नाची तारीख ठरली. मुलीच्या घरी लग्न न ठरवता चंदा हिने मुंबईतच लग्न उरकले. लग्नानंतर, तरन्नुमचे वय १८ नसून ती ४० वर्षांची असल्याचे समोर येताच त्यांना संशय आला. त्यांनी चंदाकडे चौकशी करताच तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. तरीदेखील त्यांनी तिला स्वीकारले. मात्र, काही दिवसांत तिने रंग दाखवण्यास सुरुवात केली. घरातल्यांना दादागिरी करत शिवीगाळ सुरू केली. तुम्ही माझे नोकर असून मी टाईमपाससाठी लग्न केल्याचे तिने सांगितले. घरातल्या वस्तूही गायब करण्यास सुरुवात केली. तिला रंगेहाथ पैसे चोरताना पकडताच तिने तक्रारदारांना ढकलून देत मारहाण केली. त्यानंतर तरन्नुम चंदासोबत यूपीला पळून गेली. तेथे जाऊन मुलाविरुद्धच खोटी तक्रार दिली.
तक्रार मागे घेण्यासाठी ३ लाखांची मागणी-
१) तक्रार मागे घेण्यासाठी ३ लाखांची मागणी केली. भीतीने दोन लाख रुपये देण्यासाठी तयार झाले. तक्रारदार यांचा मुलगा आणि जावई पैसे देण्यासाठी यूपीला गेले. तेथे आणखीन काही जण होते. तेथे एक लाख रुपये देत उर्वरित एक लाख रुपये मुंबईत आल्यानंतर देण्याचे ठरले.
२) काही दिवसाने ती मुंबईत आली. तिने मुलाला जबरदस्तीने यूपीला नेले. तेथे त्याला मानसिक, शारीरिक छळ केला. मुलगा मुंबईत परतल्यानंतर घडलेला प्रकार समजताच सर्वानी मिळून फसवणूक केल्याचे लक्षात आले. वृद्धेने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.