सीमा महांगडे
मुंबई - ब्रिटिशांनी मुंबईत उभारलेले उड्डाणपूल इतिहासजमा होऊ लागले आहेत. धोकादायक बनलेल्या पुलांची पुनर्बांधणी सुरू आहे. भविष्यात महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन (महारेल) रेल्वे आणि महापालिकेच्या मदतीने ब्रिटिशकालीन उड्डाणपूल पाडून त्याजागी नवे पूल बांधण्याचे नियोजन आहे.
पुनर्बांधणी झालेले
हँकॉक पूल : सॅन्डहर्स्ट रोड स्थानकाजवळ १८७९ मध्ये बांधण्यात आला होता. धोकादायक बनल्याने २०१६ मध्ये पाडण्यात आला. त्या जागी नव्या पुलाची उभारणी करण्यात आली. त्यासाठी बराच कालावधी लागला.
डिलाइल रोड : लोअर परेल येथील डिलाइल उड्डाणपूलही २४ जुलै २०१८ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पुलाची उभारणीही ब्रिटिशकाळात झाली होती. पश्चिम रेल्वे आणि महानगरपालिकेने या उड्डाणपुलाची बांधणी केली. तो २०२३ मध्ये खुला करण्यात आला.
फरेरे पूल : चर्नी रोड आणि ग्रॅन्ट रोड स्थानकांदरम्यान १९२१ मध्ये उभारण्यात आलेला फरेरे उड्डाणपूल २०२० मध्ये पाडण्यात आला आणि पुनर्बांधणीनंतर तो नोव्हेंबर २०२१ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यांनतर सीएसएमटी ते मशीद बंदर स्थानकांदरम्यान १८६८ साली कर्नाक उड्डाणपूल बांधण्यात आला.
या पुलांची कामे सुरू
रे रोड : हा उड्डाणपूल १९१० साली उभारण्यात आला. पूल पाडून त्या जागी केबल स्टेड उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. नवीन पुलाची लांबी २८० मीटर असेल आणि १७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रे रोड रेल्वे स्थानकाजवळ हा उड्डाणपूल उभारल्याने माहुल रोड आणि बॅरिस्टर नाथ पै मार्गाचे रॅम्प नवीन प्रस्तावित पुलाला जोडण्यात येतील. या पुलाचे ७७ टक्के काम पूर्ण झाले आहे. तो वाहतुकीसाठी नोव्हेंबर २०२४ पर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट आहे.
दादर टिळक : पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर दादर स्थानकाशेजारचा हा उड्डाणपूल १९२३ मध्ये बांधण्यात आला होता. आता येथे बांधण्यात येणाऱ्या केबल स्टेड पुलाची लांबी ६०० मीटर असेल आणि नव्या पुलासाठी ३७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. टिळक पूल हा दादर पश्चिम आणि पूर्व भागाला जोडणारा पूल आहे. याचे आतापर्यंत जवळपास ८ टक्के काम पूर्ण झाले आहे.
भायखळा : भायखळा आणि सॅन्डहर्स्ट रोड स्थानकांच्या मध्ये असलेला हा उड्डाणपूल १९२२ मध्ये उभारण्यात आला. आता उभारण्यात येणाऱ्या नव्या पुलाची लांबी ६५० मीटर असेल आणि उभारणीचा अंदाजे खर्च २०० कोटी रुपये आहे. या पुलाचे आतापर्यंत ४२ टक्के काम पूर्ण झाले आहे. हा पूल वाहतुकीसाठी ऑक्टोबर २०२५ पर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट आहे.
कर्नाक पूल : दक्षिण मुंबईतील पूर्व-पश्चिम परिसराला जोडणारा हा पूल महत्त्वाचा असून १८६८ मध्ये बांधण्यात आला होता. कर्नाक पुलाच्या खालून उपनगरीय रेल्वे, मेल-एक्स्प्रेस आणि यार्डच्या मार्गिका आहेत. हा पूल सहा खांबांवर उभारण्यात आला होता. धोकादायक बनल्याने २२ ऑगस्ट रोजी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर महापालिकेकडून येथे नवीन उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत असून येत्या वर्षभरात तो वाहतुकीसाठी खुली होण्याची चिन्हे आहेत.