मुंबई : इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती अवलंबत समाजात दुही निर्माण करत स्वत:चे राज्य प्रस्थापित केले होते, इंग्रज गेले; पण जाताना हे काम काँग्रेसकडे सोपवून गेले, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केली. यादव म्हणाले की, मोदी पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलतील, धर्माच्या नावावर आरक्षण मिळणार नाही, असे सांगून विविध समाज घटकांना चिथावण्याचे आणि समाजात फूट पाडण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे. गरिबांना गरीब ठेवण्याचे काँग्रेसचे वर्षानुवर्षांचे धोरण होते, तीच काँग्रेस आता गरिबांच्या खात्यात पैसे टाकण्याचे आमिष दाखवत आहेत पण मतदार काँग्रेसच्या नादाला लागणार नाहीत. मोदी सत्तेत आले तर विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांना तुरुंगात टाकतील, असा अपप्रचार काँग्रेस आणि केजरीवाल करत आहेत. आणीबाणीच्या काळात काँग्रेसच्या तत्कालीन सरकारने देशातील सर्वच विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले होते हे ते विसरलेत का, असा सवाल यादव यांनी केला. संघाच्या हिंदुत्वावर टीका करणारे उद्धव ठाकरे सत्तेसाठी हिंदुत्वविरोधी काँग्रेससोबत जाऊन बसलेत, असेही ते म्हणाले.
‘दुही निर्माण करण्याचे काम काँग्रेसकडे सोपवून इंग्रज गेले’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 12:59 PM