मुंबई -पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला तरी गोरेगाव पश्चिम जवाहर नगर येथील ओशिवरा नदीचा गाळ काढण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. गेल्या वर्षी नदीची संरक्षण भिंत अद्यापही तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे नदीलगतच्या झोपडपट्टी वस्तीत राहणा-या शेकडो कुटुंबियांचे जीव धोक्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ओशिवरा नदीची संरक्षक भिंत तातडीने दुरूस्ती करावी आणि नदीच्या सफाईच्या कामाला वेग द्यावा, अशा मागण्यांचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले. मागण्यांची योग्य दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा संघटक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
या पार्श्वभूमीव दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी आज ओशिवरा नदीची पाहणी केली आणि स्थानिकांना भेडसावणा-या समस्यांचा आढावा घेतला. यावेळी माजी शाखा संघटक राजश्री नाडकर, उपशाखाप्रमुख गंगाराम वैती, संजय भालेराव, गटप्रमुख आणि स्थानिक रहिवासी दुर्गा सिंह तसेच महेंद्र इगवे आदी उपस्थित होते. पाहणी दौ-यानंतर शिवसेनेच्यावतीने पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले. ओशिवरा नदीची तातडीने पाहणी करून संरक्षक भिंतीची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गोरेगाव ओशिवरा नदीला लागून रेल्वे पूलाच्या पश्चिमेस जवाहरनगर झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत शेकडो कुटुंब राहतात. पावसाळा जवळ आला तरी मुंबई महापालिकेकडून ओशिवरा नदीच्या सफाईचे काम पूर्ण झालेली नाही. रेल्वेच्या अखत्यारित्या येणा-या पुलाखाली देखील घाणीचे साम्राज्य पसरले असून रेल्वे प्रशासनाने त्याच्याकडे कानाडोळा केला आहे. ओशिवरा नदीतून मोठ्या प्रमाणात गोरेगाव पूर्वेपासून वाहत पाणी येत असते. त्यातच नदीची संरक्षक भिंत तुटल्यामुळे पावसाळ्यात घरात पाणी शिरून मोठे नुकसान होण्याची भीती रहिवाशीयांना सतावत आहे. या परिसरात लहान मुले आसपास खेळत असल्याने ती नाल्यात पडून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात महानगरपालिकेच्या मध्यवर्ती यंत्रणा (सेंट्रल एजन्सी) विभागाला तक्रार देऊन देखील अद्याप त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली नाही. त्यामुळे ओशिवरा नदीलगत असलेल्या रहिवाशीयांना जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहे अशी माहिती शिंदे यांनी दिली.