Join us

सात कोटी ८७ लाखांच्या ड्रग्जप्रकरणी आंतरराष्ट्रीय तस्कराच्या भावाला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 6:02 AM

खंडणीविरोधी पथकाची वसईत कारवाई, मुख्य सूत्रधार फरारच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील सर्वात मोठा आणि कुख्यात ड्रग्ज सप्लायर अशी ओळख असलेल्या कैलास राजपूत ऊर्फ केआरचा भाऊ  कमल याला खंडणीविरोधी पथकाने वसईतून अटक केली. सात कोटी ८७ लाख रुपयांच्या केटामाईन ड्रग्जप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने मार्च महिन्यात अंधेरीतून ७ कोटी ८७ लाख रुपयांचे १५ किलो ७४३ ग्रॅम केटामाइनसह ५७ लाख रुपयांची प्रतिबंधित औषधे जप्त केली होती. या प्रकरणात यापूर्वी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या चौकशीतून कमल कनेक्शन उघडकीस होताच त्याच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. त्यापाठोपाठ पथकाने वसईतून त्याला अटक केली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कैलास राजपूत अद्याप मुंबई पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो लंडनमध्ये लपून असल्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून मुंबई पोलिस लंडन पोलिसांच्या संपर्कात असून कैलास राजपूतला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

 या प्रकरणात यापूर्वी विजय राणे (५२), मोहम्मद असीम मोहम्मद इब्राहिम शेख (४६), नितेश संजय यादव (२२), विकासकुमार गुप्ता (४२), अभय जडये (४०), बाबासाहेब काकडे (४९), शितेश पवार (४०), अलीअसगर परवेझ शिराजी (४०) यांना अटक करत त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्रदेखील दाखल करण्यात आले आहे. 

भारतातून दुबई, जर्मनी करत लंडनमध्ये तळ...     कैलास राजपूत केवळ भारतातच नाही तर आखाती व युरोपीय देशांमध्येही अमली पदार्थांचा व्यापार करतो.  २०१४ पासून तो फरार आहे.     भारतातून पळून गेल्यानंतर तो दुबईमध्ये जाऊन लपला. त्यानंतर तो जर्मनीला गेला आणि आता लंडनमध्ये लपला आहे.     राजपूतचा पासपोर्ट ब्रिटन सरकारने जप्त करत, त्याला नजरकैदेतही ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली होती.      भारतात एमडी ड्रग्जचा पुरवठा करण्यात कैलास राजपूतची महत्त्वाची भूमिका आहे. मुंबई गुन्हे शाखा, दिल्ली स्पेशल सेल, डीआरआय आणि एनसीबी यांसारख्या वेगवेगळ्या एजन्सीमध्ये कैलाश राजपूत विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. एजन्सींनी त्याच्याविरुद्ध एलओसीदेखील जारी केले आहे.

टॅग्स :गुन्हेगारीअमली पदार्थ