मुंबईतील मृत बहिणीची मालमत्ता बळकावणाऱ्या गुजरातच्या भावाला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 07:31 AM2022-07-29T07:31:15+5:302022-07-29T07:32:02+5:30
बनावट कागदपत्र बनवून ७० लाखांचा फ्लॅट विकला
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : गुजरातमध्ये राहणाऱ्या भावाने मीरा रोडमधील मृत बहिणीचा सुमारे ७० लाखांचा फ्लॅट बनावट सह्या, कागदपत्रे बनवून परस्पर विकला. परंतु भाचीने तक्रार केल्यावर पोलिसांनी मामासह त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या असून, याकरिता खोट्या नोटरी करून देणाऱ्या वकिलास आरोपी केले आहे.
मीरा रोडच्या रसाज सिनेमामागे एव्हरशाईन एन्क्लेव्हच्या शिवम् इमारतीत राहणाऱ्या सबिना कुरेशी यांचे हज यात्रेत सौदी अरब येथे नोव्हेंबर २०१७ मध्ये निधन झाले. सबिना यांचे पूर्वीचे नाव मंदाकिनी होते व त्यांचा गुजरातच्या वलसाड येथील रसिक छोवाला यांच्याशी १९८५ मध्ये विवाह झाला होता. त्यांना रोशनी नावाची मुलगी होती. परंतु मंदाकिनी यांनी १९९० मध्ये मीरा रोडच्या मोहमम्द कुरेशी यांच्याशी दुसरे लग्न केले. २००४ मध्ये रसिक यांचे तर २०१० मध्ये मोहम्मद यांचे निधन झाले. मुलगी रोशनी हिचे वलसाडमध्येच रिक्षा चालवणारे सुरेश पटेल यांच्याशी लग्न झाले.
मीरा रोड येथील सबिना यांच्या फ्लॅटची चावी त्यांचा सख्खा भाऊ अमूल पटेल (रा. वलसाड) याच्याकडे होती. सबिना यांच्या निधनानंतर अमूल याने तिचे दागिने, मोबाइल आदी वस्तू मुलगी रोशनीकडे न देता स्वतःच हडप केल्या. बहिणीचा फ्लॅट व दोन बँक खात्यांतील रक्कम बळकावण्यासाठी जून २०१७ सालचे सबिनाचा बनावट अंगठा, सह्या करून बनावट मृत्युपत्र ॲड. कलाम खान (रा. काशिमीरा) याच्याकडून नोटरी करून घेतले. त्यावर साक्षीदार म्हणून मुनावर अबिद खान व एहसान गफार राजपूत यांनी सह्या केल्या. अमूल याने त्या बनावट मृत्युपत्राच्या आधारे २०१९ मध्ये सबिना हिचा फ्लॅट एहसान व त्याचा भाऊ हारून यांना विकला.
एहसान, हारून सराईत गुन्हेगार
एहसान व हारून राजपूत हे सराईत गुन्हेगार असून, बनावट कागदपत्रे तयार करून मालमत्ता बळकावण्याचे त्यांच्यावर मीरा रोड, नया नगर पोलीस ठाण्यात आधीसुद्धा गुन्हे दाखल आहेत. वकील तथा नोटरी असलेला कलाम खान हादेखील सराईत भामटा असून, त्याने यापूर्वी बनावट नोटरी करून दिल्याच्या प्रकरणात त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपींनी आणखी कोणाला फसविले असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन वनकोटी यांनी केले.
मामाने आईचे
दागिने, रोख, फ्लॅट बळकावल्याने भाची रोशनी हिच्या फिर्यादीवरून मीरा रोडच्या नयानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करून अमूल याला वलसाड येथून तर हारून व एहसान राजपूत यांना मीरा रोडमधून अटक केली. आरोपींना २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. वकील कलाम खान याचा शोध सुरू असून, आरोपींच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.