Join us  

मुंबईकरांना काय मिळणार?; महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार, सर्वांना खूश करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 8:39 AM

Budget of Mumbai Municipal Corporation: राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर नव्या सरकारचा या अर्थसंकल्पावर वरचष्मा पाहायला मिळणार आहे.

मुंबई: कोरोना केंद्र घोटाळ्याप्रकरणी महापालिकेमागे असलेला कॅगचा ससेमिरा, रस्ते कंत्राटात झालेले भ्रष्टाचाराचे आरोप तसेच एसीबीकडून केल्या जाणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांच्या चौकशीचे सावट असतानाच यंदाचा २०२३ २४ चा अर्थसंकल्प शनिवारी, ४ फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे.

पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच आगामी अर्थसंकल्प तयार केला जाण्याची शक्यता असून, मुंबईकरांना खूश करण्यासाठी त्यात भरीव तरतूद केली जाण्याची चिन्हे आहेत. यंदाचा अर्थसंकल्प ५० हजार कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता असली तरी मुंबईकरांना यातून नेमके काय मिळणार याची उत्सुकता कायम आहे. विकासाच्या दृष्टीने कोणत्या योजना राबविल्या जाणार प्रकल्प मार्गी लावले जाणार आणि किती तरतूद करण्यात येणार, अशा अनेक गोष्टींचा उलगडा अर्थसंकल्पातून होईल.

मुंबईकरांना विविध सेवासुविधा देण्यासाठी तसेच राज्याचा गाडा हाकण्यासाठी वर्षभरात आणखी किती निधी लागणार आहे, याची सर्वसामान्यांना माहिती मिळावी म्हणून दरवर्षी पालिकेकडून अर्थसंकल्प सादर केला जातो. मुंबईकरांनी भरलेल्या करातून पालिका त्या पैशांचा विनियोग कशा प्रकारे करते याची इत्थंभूत माहिती या अर्थसंकल्पात असते. मुदत संपल्याने ७ मार्च २०२२ रोजी मुंबई पालिका बरखास्त करण्यात आली. तेव्हापासून पालिकेचा कारभार हा प्रशासक आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांच्याद्वारे सुरू आहे. 

राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर नव्या सरकारचा या अर्थसंकल्पावर वरचष्मा पाहायला मिळणार आहे .सकाळी १०:३० वाजता म हापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे या शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प प्रशासक इकबाल सिंग चहल यांना सादर करणार आहेत, तर मुख्य अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु हे चहल यांना सादर करणार आहेत.

अर्थसंकल्पात काय असेल?

अर्थसंकल्पात रस्ते, पूल, विविध रखडलेले प्रकल्प याकरिता भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय शिक्षण विभाग, आरोग्यसेवा, कोस्टल रोड, गोरेगाव मुलंड लिंक रोड, यासाठी ही जास्त तरतूद केली जाऊ शकते. याशिवाय मलनिस्सारण प्रकल्प पर्जन्य जलवाहिन्या, उद्याने यासाठी तरतूद केली जाईल. इतकेच नव्हे तर बेस्टलासुद्धा मदतीचा हात मिळण्याची शक्यता आहे.

सर्वांना खूश करणार-

आगामी निवडणुका पाहता मुंबईकरांना खूश ठेवण्यासाठी मालमत्ता करात दरवाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार नाही. इतकेच नव्हे तर मुंबईकरांना खुश करण्यासाठी नव्या घोषणा होण्याची शक्यताच जास्त आहे.

टॅग्स :अर्थसंकल्प 2023मुंबई महानगरपालिकामहाराष्ट्र सरकार