मुंबई :मुंबई शहर आणि उपनगरातील झोपड्यांचा पुनर्विकास केल्यानंतर उभ्या राहणाऱ्या इमारतीची देखभाल दुरुस्ती बिल्डरला ३ वर्षे करावी लागत होती. आता हा दोष दुरुस्त कालावधी ३ वर्षांहून १० वर्षे करण्यात आला आहे. त्यामुळे एसआरए इमारतीमधील रहिवाशांना दिलासा देत एसआरने बिल्डरला दणका दिला आहे.
गोरेगाव येथील जय भवानी माता एसआरए इमारतीला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर मुंबईतल्या एसआरए इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. एसआरए इमारत बांधून झाल्यानंतर इमारतीकडे बिल्डर दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी एसआरए इमारतींमधील रहिवाशांनी केल्या होत्या. याचदरम्यान, आगीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने बिल्डरकडून केल्या जाणाऱ्या देखभाल दुरुस्तीचा कालावधी ३ वर्षांहून १० वर्षे करण्यात यावा, असे सुचविले होते. त्यानंतर सुरू असलेल्या प्रक्रियेत एसआरएने यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार, दोष दुरुस्त कालावधी १० वर्षे राहणार आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर :
इमारत बांधून दिल्यानंतर बिल्डरने किमान १० वर्षे तरी प्रमुख गोष्टींची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असे एसआरएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, बिल्डरकडून रहिवाशांची अडवणूक केली जाते. अनेक इमारतीमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतो. मात्र एसआरएच्या इमारतींना काही वर्षांत गळती लागते. बिल्डरकडून एसआरए इमारतीची देखभाल दुरुस्ती केली जात नाही.
जिन्याच्या वापरावर बिल्डरने भर द्यावा :
एसआरए इमारतीमधील सुरक्षेबाबत अधिकाधिक सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे आदेश यामध्ये प्रामुख्याने इमारतीच्या लिफ्टची देखभाल दुरुस्ती आणि फॅब्रिकेट जिन्याच्या वापरावर बिल्डरने भर द्यावा, असे आदेश देण्यात आले होते. आगीपासून सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी उपकरणांचे अग्निशामक पूर्णत्व प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
एसआरएच्या निर्णयाचे किंवा परिपत्रकाचे स्वागत आहे. बिल्डरने एसआरए इमारतीची काय दुरुस्ती केली? त्याचा अहवाल बिल्डरने शासनाला सादर केला का? बिल्डरने खरेच काम केले आहे की केवळ कागदोपत्री कामे झाली आहेत? हेसुद्धा तपासणाऱ्या यंत्रणेची गरज आहे. नियमांची परिपूर्ती होणे हा मुद्दाही महत्त्वाचा आहे.- डॉ. सुरेंद्र मोरे, गृहनिर्माण तज्ज्ञ
बिल्डरने निकृष्ट दर्जाचे बांधकाम करता कामा नये. सेलेबल इमारत आणि एसआरए इमारतीमध्ये तुलना केली तरी सेलेबल इमारतीच्या दुरुस्तीची गरज भासत नाही. मात्र एसआरएच्या इमारतींना काही वर्षांत गळती लागते. बिल्डरकडून एसआरए इमारतीची देखभाल दुरुस्ती केली जात नाही. रहिवाशांनाच पैसे काढावे लागतात ही वस्तुस्थिती आहे.- ॲड. संतोष सांजकर, अध्यक्ष, राइट टू शेल्टर