‘लोकमत’चा दणका; नोकरभरती निकाल एक दिवसात लागला
By दीपक भातुसे | Published: November 24, 2023 06:48 AM2023-11-24T06:48:17+5:302023-11-24T06:48:46+5:30
सहा पैकी तीन विभागांचे निकाल जाहीर
दीपक भातुसे
मुंबई : शासकीय सरळसेवा नोकरभरतीच्या सहा विभागांच्या परीक्षा होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी निकाल न लागल्याप्रकरणी ‘लोकमत’ने बातमी प्रकाशित करताच यातील तीन विभागांना जाग आली असून, त्यांनी नोकरभरतीचा निकाल गुरुवारी जाहीर केला.
‘आमचा निकाल कधी लावता? २५ लाख बेरोजगारांचा प्रश्न’ या मथळ्याखाली बुधवारी ‘लोकमत’मध्ये बातमी प्रकाशित केल्यानंतर कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि वनविभागाने भरती परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे. राज्यात जुलै २०२३ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सहा विभागांच्या परीक्षा पार पडल्या. यात महसूल विभागातील तलाठी, पशु संवर्धन, सहकार, वनविभाग, कृषी आणि अर्थ सांख्यिकी विभागाच्या परीक्षांचा समावेश होता. मात्र, परीक्षा होऊन तीन ते चार महिने उलटूनही निकाल लागत नसल्याने परीक्षार्थी नैराश्येत होते.
या विभागांचे निकाल जाहीर
कृषी विभागाच्या सहायक अधीक्षक संवर्गाच्या भरतीसाठी एप्रिल महिन्यात जाहिरात प्रकाशित झाली होती, त्याचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे. मात्र, निवडसूची व प्रतीक्षासूची लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
पशुसंवर्धन विभागाने निकाल जाहीर करत गुणवत्ता यादी आणि निवड यादी जाहीर केली.
वनविभागाने निकाल जाहीर करतानाच भरती प्रक्रियेचे पदानुसार पुढील टप्पे तारखेसह जाहीर केले आहेत. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले जाणार आहेत.
२५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा
मागील तीन ते चार महिन्यांपूर्वी झालेल्या परीक्षांमध्ये तलाठी पदासाठी तब्बल ११ लाख अर्ज आले होते, तर वनविभागाच्या परीक्षेसाठी साडेपाच लाख अर्ज आले होते. उर्वरित परीक्षांसाठीही लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यामुळे या सहाही विभागांच्या परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा आकडा २५ लाखांच्या पुढे आहे.