घरकामाचा भार जोडप्याने समसमान उचलावा, उच्च न्यायालयाचे परखड मत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 12:29 PM2023-09-15T12:29:24+5:302023-09-15T12:32:03+5:30
Court: आधुनिक समाजात, घरातील जबाबदाऱ्या पती-पत्नी दोघांनाही सारख्याच उचलाव्या लागतात. स्त्रीनेच घराच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्यात, अशी अपेक्षा करणाऱ्या आदिम मानसिकतेत सकारात्मक बदल होण्याची गरज आहे
मुंबई : आधुनिक समाजात, घरातील जबाबदाऱ्या पती-पत्नी दोघांनाही सारख्याच उचलाव्या लागतात. स्त्रीनेच घराच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्यात, अशी अपेक्षा करणाऱ्या आदिम मानसिकतेत सकारात्मक बदल होण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत नोंदवत उच्च न्यायालयाने १३ वर्षांचा संसार मोडीत काढण्याची मागणी करणाऱ्या व्यक्तीचे अपील फेटाळून लावले.
एका ३५ वर्षीय व्यक्तीने त्याचा घटस्फोट अर्ज फेटाळण्याच्या कुटुंब न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आपली पत्नी नेहमी फोनवर बोलत असते. ती घरातली कामे करत नाही, असा आरोप पतीने केला, तर आपल्याला कार्यालयातून परत आल्यावर घरातील सर्व कामे करण्यास भाग पाडले जाते आणि माहेरी संपर्क साधल्यास शिवीगाळ करण्यात येते, असा आरोप पत्नीने केला. विभक्त पत्नी आपल्याशी क्रूरतेने वागली हा दावा पती सिद्ध करू शकला नाही, असे म्हणत न्या. नितीन सांब्रे व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने अपील फेटाळले.
न्यायालय म्हणाले...
स्त्री आणि पुरुष दोघेही नोकरी करतात आणि पत्नीने घरातील सर्व कामे करावीत, अशी अपेक्षा करणे ही प्रतिगामी मानसिकता दर्शवते.
लग्नसंस्थेमुळे पत्नी तिच्या पालकांपासून वेगळी व्हावी आणि तिने पालकांशी संबंध तोडावे, अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही.
एका जोडीदाराने त्याच्या पालकांच्या संपर्कात राहणे, हे दुसऱ्या जोडीदाराला मानसिक त्रासदायक ठरते, अशी कल्पना करू शकत नाही.
पत्नीला तिच्या पालकांशी संपर्क तोडण्यास सांगणे ही खरे तर पत्नीसाठी मानसिक क्रूरता आहे.