मुंबई- मध्य प्रदेशातील इंदोर येथून महाराष्ट्रात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एक बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. नदी पात्रातून आतापर्यंत १२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सर्वांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये एसटीचे चालक आणि वाहक यांचाही समावेश असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
सदर घटनेनं देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे.
मध्य प्रदेशातील इंदौरहून जळगावच्या अमळनेरला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. सर्व मृत प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली. सर्व जखमी लवकर बरे होवोत, ही प्रार्थना, असं उद्धव ठाकरेंनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अमळनेर (जळगाव जिल्हा) आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक एम एच ४० एन ९८४८ ही आज सकाळी ७.३० च्या सुमारास इंदोर येथून मार्गस्थ झाली. त्यानंतर मध्य प्रदेशमधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर ही बस अपघातग्रस्त होवून नर्मदा नदीत कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत मदत व बचाव कार्याबाबत विनंती केली. स्थानिक जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या बचावकार्यात १२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. हे सर्व मृतदेह धामणोत येथील ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले असून अजूनही शोधमोहिम सुरु आहे.
दुर्घटनेतील सर्व मृतदेहांची ओळख पटली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे…
१.चंद्रकांत एकनाथ पाटील - (४५) (चालक) अमळनेर २. प्रकाश श्रावण चौधरी (वाहक), अमळनेर ३.अविनाश संजय परदेशी, अमळनेर ४.राजू तुलसीराम (३५) राजस्थान, ५. जगन्नाथ जोशी -(६८) राजस्थान, ६. चेतन जागीड, राजस्थान ७. निंबाजी आनंदा पाटील,अमळनेर, ८. सैफउद्दीन अब्बास अली बोहरा, मध्यप्रदेश ९. कल्पना विकास पाटील - (५७) धुळे, १०. विकास सतीश बेहरे - (३३) धुळे, ११.आरवा मुर्तजा बोहरा - (२७) अकोला, १२. रुख्मणीबाई जोशी, राजस्थान.