सुट्टीच्या हंगामात मंदावला मराठी सिनेमांचा धंदा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 08:06 PM2024-04-09T20:06:54+5:302024-04-09T20:07:09+5:30
दोन आठवड्यांमध्ये एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही; बड्या हिंदी सिनेमांचेही आव्हान!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कायम प्राईम शो मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मराठी सिनेमांचा बिझनेस मागील दोन आठवड्यांपासून थंडावला आहे. मार्च मधील अखेरच्या आठवड्यात एक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एप्रिलमध्ये अद्याप एकही मराठी चित्रपट आलेला नाही. या आठवड्यात 'बडे मियां छोटे मियां' आणि 'मैदान' या दोन बड्या हिंदी चित्रपटांचे आव्हान असल्याने मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नाही.
मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाचे बेसिक प्रश्नांवरही अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. एखाद्या आठवड्यात पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज होतात, तर काही वेळेला एक-दोन आठवडे एकही मराठी चित्रपट येत नाही. २९ एप्रिलला 'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर' हा चित्रपट रिलीज झाला होता. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच ५ एप्रिलला कोणताही मराठी चित्रपट आलेला नाही. या आठवड्यातही तेच चित्र पाहायला मिळणार आहे. ११ एप्रिलला 'बडे मियां छोटे मियां' या बिग बजेट चित्रपटासोबत भारतीय हॅाकीमधील सुवर्णक्षणांची आठवण करून देणारा 'मैदान' रिलीज होणार आहे. या दोन चित्रपटांसमोर आपला चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस कोणत्याही मराठी निर्मात्याने केलेले नाही. १९ एप्रिलला 'मायलेक' हा एकमेव चित्रपट रिलीज होणार आहे. २६ एप्रिलला पुन्हा तीन चित्रपटांची गर्दी होणार आहे. या दिवशी 'माहेरची साडी' फेम विजय कोंडकेंच्या पुनरागमनातील 'लेक असावी तर अशी', महेश मांजरेकर दिग्दर्शित-अभिनीत 'जुनं फर्निचर' आणि मनोज जरांगे पाटीलांवरील 'संघर्षयोद्धा' हे तीन चित्रपट येणार आहेत. नियोजनबद्ध चित्रपट प्रदर्शनाच्या अभावामुळे मराठी सिनेसृष्टीत वारंवार अशा प्रकारचे संघर्षाचे चित्र पाहायला मिळत असल्याचे चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
यावर 'लोकमत'शी बोलताना पिकल एन्टरटेन्मेंटचे सर्व्हेसर्वा वितरक समीर दीक्षित यांनी बऱ्याच मुद्द्यांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, दोन मोठे हिंदी सिनेमे रिलीज होण्यासोबतच इतरही काही फॅक्टर्स याला कारणीभूत आहेत. कोरोनाच्या काळातील चित्रपटांचा बॅकलॉाग संपत आल्याने जास्त सिनेमे उरलेले नाहीत. महाराष्ट्राच्या काही भागांत उन्हाळ्याचा प्रभाव वाढला आहे. निवडणूकीचे वातावरणही तापू लागले आहे. अशी विविध कारणे आहेत. चौथ्या आठवड्यात पुन्हा तीन सिनेमे येणे हे नियोजनबद्धतेच्या अभावामुळे घडत आहे. आम्ही वितरक एकमेकांशी संपर्क साधून आपल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा एकमेकांशी शेअर करत असतो, पण कित्येकदा निर्माते ऐकायला तयार नसल्याने एकाच आठवड्यात जास्त चित्रपट रिलीज होतात. त्यामुळे सर्वांचेच नुकसान होते.
महामंडळाचा अंकुष नाही...
कोणता चित्रपट कधी प्रदर्शित करायचा हा निर्णय दक्षिणेकडे निर्मात्यांचे चित्रपट मंडळ घेते, पण मराठीत मात्र याची बोंबाबोंब आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे स्थान सेन्सॅार सर्टिफिकेटसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यापलिकडे नाही. या संस्थेचा सिनेसृष्टीवर अंकुष नसल्याने कोणाचा कोणाला मेळ नसल्याचे चित्र वारंवार दिसत असल्याचेही दीक्षित म्हणाले.