सोड्याच्या बाटलीचे बुच उडून, दुबईच्या तरुणाचा डोळा जखमी!
By गौरी टेंबकर | Published: January 9, 2024 03:31 PM2024-01-09T15:31:00+5:302024-01-09T15:31:20+5:30
या विरोधात तरुणाने सोडा विक्री करणारा कर्मचारी विश्वानाथ सिंग याच्या विरोधात तक्रार दिल्यावर कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई: दुबईमध्ये फायनान्सचे काम करणाऱ्या भारतीयाला मुंबईत सोडा प्यायला जाणे महागात पडले. कर्मचारी सोडा बनवताना बाटलीचे बूच हे सोड्यासह डोळ्याला आदळून डोळा जखमी झाला. या विरोधात तरुणाने सोडा विक्री करणारा कर्मचारी विश्वानाथ सिंग याच्या विरोधात तक्रार दिल्यावर कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार सिद्धेश सावंत हा खार दांडा परिसरात आई-वडिलांसोबत राहत असून तो दुबईत फायनान्सचे काम करतो. डिसेंबर महिन्यामध्ये तो मुंबईत आल्यावर त्याच्या मित्र-मैत्रिणींना भेटत होता. त्यानुसार ६ जानेवारीला देखील मालाड पश्चिमला ही सगळी मित्रमंडळी भेटली व तिथून त्या सर्वांनी सोडा पिण्यासाठी कांदिवलीतील महावीर नगरच्या खाऊ गल्लीत दिलखुश सोडा सेंटर याठिकाणी जाण्याचे ठरवले. त्यानुसार सावंतने तीन सोडायची ऑर्डर दिली. सावंत च्या तक्रारीनुसार, सोडा कर्मचारी हा सोडा बॉटल्स हलवून त्यातील फैसाळता सोडा हवेत उडवून ग्लास मध्ये ओतत होता. सावंतकडे दोन सोड्याचे ग्लास दिल्यानंतर तिसरा बनवण्यासाठी जेव्हा त्याने तोच प्रकार केला. तेव्हा सोडा बाटलीचे बुच हे आतल्या फेसाळत्या द्रवासह बाहेर निघाले आणि थेट सावंतच्या डाव्या डोळ्याच्या बुब्बुळाला जाऊन आदळले. त्यामुळे त्याचा डोळा जखमी होऊन त्यातून रक्त येऊ लागले आणि त्याला दिसेनासे झाले. ते पाहून त्याच्या मैत्रिणी त्याला सावरत कांदिवली पश्चिम च्या डॉक्टर रागिनी एम देसाई यांच्याकडे उपचारासाठी नेले.
डॉक्टरांनी त्याला उपचार देत डोळ्याच्या पडद्याची तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र त्याला वेदना सहन होत नसल्याने त्याने कांदिवली पश्चिमच्या शताब्दी रुग्णालयात जाऊन पुन्हा उपचार घेतले आणि दिलखुश सोडा सेंटर चालका विरोधात तक्रार देण्यासाठी कांदिवली पोलिसात धाव घेतली.