कॅन्सरग्रस्त ससा जगण्याच्या शर्यतीत मात्र ठरला विजयी, पायावर यशस्वी शस्त्रक्रिया, ‘टाटा’च्या डॉक्टरांची कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 12:07 PM2022-06-23T12:07:06+5:302022-06-23T12:07:37+5:30
Medical News: आजपर्यंत आपण कर्करोग रुग्णांवर उपचार करून त्यांचे प्राण डॉक्टर वाचवितानाचे ऐकले असेल. मात्र, लोणावळ्यातील कर्करोगग्रस्त एका सशाच्या पायावरील मोठी गाठ काढण्यासाठी त्याचा पाय शस्त्रक्रिया करून कापावा लागणार होता.
- संतोष आंधळे
मुंबई : आजपर्यंत आपण कर्करोग रुग्णांवर उपचार करून त्यांचे प्राण डॉक्टर वाचवितानाचे ऐकले असेल. मात्र, लोणावळ्यातील कर्करोगग्रस्त एका सशाच्या पायावरील मोठी गाठ काढण्यासाठी त्याचा पाय शस्त्रक्रिया करून कापावा लागणार होता. मात्र, प्राण्याच्या डॉक्टरांनी नियोजन करून जवळपास एक किलोची गाठ काढून सशाचा पाय वाचविला. टाटा रुग्णालयाच्या खारघर येथील ऍक्टरेक या संशोधन विभागातील प्राणी कर्करोग काळजी केंद्राच्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली आहे.
खोपोली येथे राहणाऱ्या भावना वशिष्ठ यांच्या घरात त्यांनी १० ससे पळाले असून, त्यापैकी बिंकू नाव असलेला मादी सशाच्या पुढील पायावर वर्षभरापासून गाठ आली होती. त्यामुळे त्या सशाला चालता येत नव्हते. त्यांनी ५-६ पशुवैद्यकीय डॉक्टरांना या सशाला उपचारासाठी दाखविले. अखेर दोन महिन्यांपूर्वी वशिष्ठ यांनी खारघर येथील प्राणी कर्करोग काळजी केंद्रातील डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांनी सुचविलेल्या चाचण्या आणि सिटी स्कॅन करून बघितला. तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आले की ही गाठ खूप मोठी असून, छातीपर्यंत पसरली आहे. याकरिता त्यांना या सशाचा पाय कापावा लागण्याची शक्यता आहे.
याबाबत वशिष्ठ यांनी सांगितले की, आम्ही अनेक ठिकाणी उपचारासाठी फिरलो. अनेक दिवस हा ससा वेदना सहन करून एकाच ठिकाणी पडलेला असायचा. एका डॉक्टरने याचे पुढे काही होणार नाही, असे सांगितले. त्यानंतर काही डॉक्टर्सना संपर्क केल्यावर या केंद्राची माहिती मिळाली. तेथे सशाला दाखल केले. तेथे पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता ससा सर्वसामान्य आयुष्य जगत आहे.
योग्य नियोजनातून यशस्वी शस्त्रक्रिया
सशाची गाठ पायावरून छातीपर्यंत गेली होती. त्यासाठी आम्ही व्यवस्थित नियोजन केले आणि शस्त्रक्रिया करून ती गाठ काढली. यामुळे त्याचा पायही आम्ही वाचवू शकलो. यासाठी डॉ. राजीव सरीन आणि डॉ. किरण भेंडाळे यांचे सहकार्य लाभले, असे डॉ. प्रदीप चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. डॉ. चौधरी हे या रुग्णालयात कर्करोग पशुवैद्यकीय तज्ज्ञ आहेत.