मुंबई : दारूच्या नशेत वेगाने कार चालविल्याने एका तरुणीला जीव गमवावा लागल्याची दुर्घटना जुहू येथे शुक्रवारी पहाटे घडली. मृत तरुणीचे नाव पल्लवी भट्टाचार्य असे असून ती मूळची पश्चिम बंगालची राहणारी आहे. या अपघातात तीन जण जबर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयानक होता की गाडी जवळपास ३० मीटर उंच हवेत उडाली आणि खाली पडली असे सूत्रांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्वर्यू बांदेकर (२७), पल्लवी भट्टाचार्य (२९), भारती राय (२४) आणि अंकित खरे (३८) या चौघांनी साकीनाका परिसरातील एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये पहाटे तीनपर्यंत पार्टी केली. त्यानंतर मर्चंट नेव्हीत असलेल्या अध्वर्यूने उर्वरित तिघांना बीएमडब्ल्यू गाडीतून त्यांच्या हॉटेलात सोडण्याचा निर्णय घेतला. दारूची नशा आणि कारचा वेग यामुळे बांदेकरला अंधारात स्पीड ब्रेकर दिसला नाही. परिणामी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार जाऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कचरा व्हॅनवर धडकली असे पोलिसांनी सांगितले. हा अपघात पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की पल्लवी जागीच ठार झाली. बांदेकर अंधेरी पश्चिमच्या लोखंडवाला संकुलातील डीएलएच ऑर्किड टॉवरचे रहिवासी आहेत, तर भट्टाचार्य पश्चिम बंगाल, राय शिमला येथील आणि खरे हे हरियाणाचे रहिवासी आहेत.
भारती एका एअरलाइनमध्ये केबिन क्रू मेंबर आहे, तर अंकित हा एका व्यावसायिकाचा मुलगा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. जुहू पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
टॅटू हटवण्यासाठी आलेली मुंबईत- पल्लवी ही एअरहोस्टेस होती. मात्र, तिची कंपनी दिवाळखोरीत गेल्यामुळे तिची नोकरी गेली. त्यानंतर दुसऱ्या एका एअरलाइन्स कंपनीत तिची निवड झाली होती. मुलाखतीदरम्यान तिच्या हातावर टॅटू असल्याचे दिसले. त्यामुळे एअरलाइन्सने तिला टॅटू काढून कामावर रुजू होण्यास सांगितले. - तो टॅटू काढण्याच्या ट्रीटमेंटसाठी ती मुंबईत आली होती. दरम्यान, तिचा ज्या गाडीमुळे जीव गेला त्या गाडीचा वेग १२० किमी प्रतितासाहून अधिक होता. - त्यानुसार पोलिसांनी चालक बांदेकर याला नोटीस बजावली आहे. बांदेकर याच्यावर सध्या मालाडच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.