मुंबईत बॅलार्ड पिअर बंदरावर मालवाहू बोट बुडाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या बोटीत असलेल्या तिघांना वाचवण्यात यश आलं असून तिघांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.
मुंबईच्या बॅलार्ड पिअर बंदरानजीक एक मालवाहू बोट बुडल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. शिप-टू-शोअर करण्याची प्रक्रिया सुरू असताना ही घटना घडली. परदेशातून आलेल्या जहाजावरील माल किनाऱ्यावर आणण्यासाठी (शिप टू शोअर) ही बोट तैनात करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक बिघाड झाल्याने ती बुडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. बोटीत तीन खलाशी होते. बोट बुडत असल्याचा अंदाज आल्याने त्यांनी उड्या मारत स्वतःचा जीव वाचवला. जवळच्या एका मालवाहू बोटीवर असलेल्या अन्य खलाशांनी त्यांना दोरीच्या साहाय्याने आत घेतले. त्यानंतर काही सेकंदानी या बोटीला जलसमाधी मिळाली.
दरम्यान, या बोटीत क्षमतेहून अधिक माल भरला गेला होता का, या दिशेनेही मुंबई पोर्ट ट्रस्टकडून तपास केला जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली