गोरेगाव आगीचे कारण तीन दिवसांत कळणार; अग्निशमन दलप्रमुखांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 01:48 PM2023-10-08T13:48:17+5:302023-10-08T13:48:37+5:30
चौकशीअंती संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अग्निशमन प्रमुख अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी दिली.
मुंबई : गोरेगावच्या जय भवानी या एसआरए इमारतीत शुक्रवारी लागलेल्या आगीत ७ जणांचा गुदमरून मृत्यू झाला, तर अनेक रहिवासी जायबंदी झाले. ही आग लागण्याचे नेमके कारण काय, आग कशी पसरली, याचा अग्निशमन दलाकडून तपास सुरू असून, या प्रकरणाचा अहवाल तीन दिवसात समोर येणार आहे. चौकशीअंती संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अग्निशमन प्रमुख अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी दिली.
गोरेगाव पश्चिम येथील ‘जय भवानी’ या एसआरए सातमजली इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आग लागली. येथील भंगार साहित्य, चिंध्या आणि कपड्यांच्या गाठोड्यांनी अचानक पेट घेतला आणि क्षणात आगीचा भडका उडाला. रहिवासी झोपेत असताना वरच्या मजल्यावरील घरांमध्ये धूर पसरला. त्यामुळे अनेकजण गुदरमरले. या इमारतीत अग्निशमन यंत्रणा नव्हती. त्यामुळे आग भडकली, असे सांगण्यात येत असले तरी या दुर्घटनेबाबत सविस्तर तपास अग्निशमन दलाचे अधिकारी करत आहेत. तसेच या इमारतीत अग्निशमन यंत्रणा उपलब्ध होती की नव्हती, असेही रवींद्र अंबुलगेकर यांनी सांगितले.